अकोला : महापालिका निवडणूक व पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर आता स्वीकृत सदस्य निवडीचे सर्वांना वेध लागले. राजकीय पक्षाचे नेतृत्व कुणाला संधी देणार याची चर्चा रंगू लागली आहे. स्वीकृत सदस्य होण्यासाठी भाजप-काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा आहे. पक्ष नेतृत्व कुणाला संधी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अकोला महापालिकेच्या २० प्रभागातील ८० जागांसाठी निवडणूक झाली. मतदारांनी कुठल्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. भाजप व राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढली, तर शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर दंड थोपाटत मित्र पक्षाला आव्हान दिले होते. शिवसेना ठाकरे गटही स्वतंत्रपणे मैदानात होते. वंचित आघाडीचा देखील काही प्रभागात प्रभाव दिसून आला. बहुमतापासून दूर राहिल्याने भाजपने शहर सुधार आघाडी गठीत करून दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सहकार्यातून सत्तास्थापन केली. शहर सुधार आघाडीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती भाजपचे झाले. यानंतर आता सर्वांच्या नजरा स्वीकृत सदस्य पदावर खिळल्या आहेत.

महापालिका अधिनियमानुसार १० सदस्यांमागे एक सदस्य निवडला जाईल. त्यानुसार ८० संख्याबळ असलेल्या महापालिकेत एकूण आठ स्वीकृत नगरसेवक अकोला महापालिकेत निवडले जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३८ जागा निवडून आल्याने भाजपचे चार, तर २१ जागा निवडून आलेल्या काँग्रेसचे दोन स्वीकृत सदस्य निवडले जातील. भाजपमध्ये स्वीकृत सदस्य होण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. अनेक इच्छुकांनी या पदासाठी मोर्चेबांधणी केली. भाजप नेतृत्वाच्या भूमिकेवर सर्व अवलंबून राहील. भाजप पराभूतांचे पुनर्वसन करणार की धक्कातंत्र वापरत नव्यांना संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी चूरस बघायला मिळते. स्वीकृत नगरसेवक निवडण्याच्या बाबतीत काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक निर्णय घेतला. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक होण्याच्या अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले. या संदर्भात प्रदेश काँग्रेसने स्थानिक पदाधिकाऱ्यांना अवगत केले. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढून पराभूत झालेल्यांना आता स्वीकृत म्हणून संधी मिळणार नाही. त्यामुळे काँग्रेस स्वीकृत सदस्य म्हणून कुणावर विश्वास टाकणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम कसा?

स्वीकृत सदस्यांसाठी नामनिर्देशन पत्र वितरण २ मार्चपासून सुरू झाले. ६ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत महापालिका आयुक्तांकडे अर्ज सादर करावा लागेल. स्वीकृत सदस्य निवडीसाठी ९ मार्चला सकाळी ११ वाजता महापालिकेत सभा आयोजित करण्यात आली आहे.

इतर पक्षांना संधी?

अकोला महापालिकेत संख्याबळानुसार भाजपचे चार व काँग्रेसचे दोन स्वीकृत सदस्य होतील. उर्वरित दोन स्वीकृत सदस्यांसाठी इतर पक्षांना संधी मिळू शकते. शिवसेना ठाकरे गट सहा, वंचित आघाडी पाच, राष्ट्रवादी शरद पवार गट तीन, एआयएमआयएम तीन, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महानगर विकास समिती एक व अपक्ष प्रत्येकी एक सदस्य संख्या आहे.