अकोला : अकोला महापालिकेत काँग्रेस गटनेतेपदी डॉ. झिशान हुसेन यांची निवड केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून गटनेतेपदासाठी डॉ. झिशान हुसेन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. काँग्रेसचे सर्व नगरसेवक शुक्रवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होऊन गट स्थापन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे पाटील यांनी दिली.

अकोला महापालिकेची निवडणूक अटीतटीची झाली. अकोलेकरांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. भाजपला सर्वाधिक ३८ जागा, तर काँग्रेसने २१ ठिकाणी विजय मिळवत दुसरे स्थान प्राप्त केले. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी इतर पक्षांसोबत बोलणी करून समीकरण जुळवण्याची काँग्रेसने धडपड केली. भाजपने शहर सुधार आघाडी नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन स्थापन करून विरोधकांचे प्रयत्न उधळून लावले. महापौर व उपमहापौर पदावर भाजपने वर्चस्व कायम राखले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या गटनेते पदाची निवड लांबणीवर पडली होती. काँग्रेसच्या गटनेते पदाच्या निवडीवरून पक्षातील नगरसेवकांमध्ये दोन गट निर्माण झाले. डॉ. झिशान हुसेन यांच्या नावाला काहींचा विरोध होता. अखेर गटनेता पदाच्या नावाचा अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कोर्टात गेला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांच्यावरच शिक्कामोर्तब केले. या संदर्भात प्रदेशाध्यक्षांनी महानगर काँग्रेसकडे एक पत्र पाठवले आहे. त्यानंतर आता ६ फेब्रुवारील काँग्रेसचे सर्व नगरसेवक अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होऊन अधिकृत गटाची नोंदणी करणार आहेत. गटनेता पदी डॉ. झिशान हुसेन यांची निवड केली जाईल.

विरोधी पक्ष नेत्यांची माळ गळ्यात पडणार

अकोला महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदाची संधी काँग्रेसला मिळेल. गटनेता म्हणून डॉ. झिशान हुसेन यांच्याच गळ्यात विरोधी पक्ष नेत्याची माळ पडेल. या अगोदरही डॉ. झिशान हुसेन यांनी महापालिकेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडली आहे. करवाढी विरोधात त्यांनी न्यायालयीन लढा देखील दिला होता.

अधिकृत गटाची नोंदणी होईल

महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांची निवड करण्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंजुरी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकृत गटाची नोंदणी शुक्रवारी केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे पाटील यांनी दिली.