अकोला : अकोला महापालिकेची निवडणूक महायुती व महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याकडे नेतृत्वाचा कल आहे. या संदर्भात नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून जागा वाटपाचे भिजत घोंगडे कायम असल्याचे दिसून येते. अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असतांनाही जागा वाटपाचे झाले नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला. शेवटपर्यंत ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत राहून बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न नेतृत्वाकडून केले जात आहेत.

अकोला महापालिकेच्या २० प्रभागातील ८० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्जाची मोठ्या संख्येने उचल करण्यात येत असली तरी दाखल करण्याला अद्यापही वेग आलेला नाही. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती करून निवडणूक लढण्याची तयारी आहे. त्यासाठी प्रदेशसह स्थानिक नेते देखील अनुकूल आहेत. मात्र, जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे. गेल्या वेळेस सर्वाधिक ४८ व एक समर्थित असे ४९ नगरसेवक भाजपचे होते. त्यामुळे महायुतीत मोठा भाऊ म्हणून भाजप ६० ते ६५ जागा लढण्याची शक्यता आहे. एकत्रित शिवसेनेच्या आठ जागा, तर राष्ट्रवादीच्या पाच जागा होत्या. आता महायुतीमध्ये त्यांना तेवढ्याच किंवा एक-दोन जागा वाढवून मिळण्याचा अंदाज आहे. जागा वाटपावरून नेत्यांमध्ये चर्चा झाली असून कोणती जागा कुणासाठी सोडायची यावरून एकमत झाले नसल्याची माहिती आहे. महायुतीचे भवितव्य चर्चेत अडकले असून इच्छुकांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येते.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मनसे देखील ठाकरे गटासोबत आहे. मुस्लीम बहुल भागातील इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडे अधिक दिसून येतो. मविआमध्ये हे सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढण्याचे जवळपास निश्चित असले तरी जागा वाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरूच आहे. यावर उद्यापर्यंत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुती म्हणून लढण्याची भावना

महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढण्याची नेतृत्वाची व कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यासाठी दृष्टीने चर्चा सुरू असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असे भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.

मविआत घटक पक्ष एकत्र, वंचित नाहीच

मविआमध्ये घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आहे. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून उद्यापर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल. वंचितसोबत आघाडी झालेली नाही, अशी माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांनी दिली.