अकोला : अकोला महापालिकेत विरोधी गटातील १६ नगरसेवकांना निलंबित केल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गाजला. या मुद्द्यावरून सभेत गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून विरोधी पक्षनेत्याच्या कक्षासमोर निलंबित नगरसेवकांनी प्रतीकात्मक सभा घेतली. सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचारासह मनमानी कारभाराचा आरोप करण्यात आला. या प्रतीकात्मक सभेची चांगलीच चर्चा रंगली.
निलंबन मागे घेण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळली
महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ घातल्या प्रकरणी महापौरांनी १६ सदस्यांना तीन सभांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी निलंबन मागे घेण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ती मागणी फेटाळून लावत सभेचे कामकाज सुरू केले. या मुद्द्यावरून सभेत चांगलाच गदारोळ झाला. सभेच्या सुरुवातीला गेल्या तीन सभांचे इतिवृत्त विषय क्रमांक २० ला मंजुरी देण्यात आली. विविध निधी योजनेंतर्गत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. निधीतून कामे करण्यासंदर्भात नगरसेवकांनी विविध कामे सूचवली. नागरी लोककल्याण अभियान राबविण्यावर कामे प्रस्तावित केले. इतरही काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
निलंबित नगरसेवकांचे प्रतीकात्मक सभेत कामकाज
दरम्यान, विरोधी पक्षातील निलंबित नगरसेवकांनी महापालिका परिसरात प्रतीकात्मक सभा घेऊन महापौर व उपमहापौरांची निवड केली. विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी नगर सचिवांची भूमिका पार पाडली. या प्रतीकात्मक सभेत १६ नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली. वंचितचे सुनील इन्नानी यांनी घरकुलासाठी कंपनी नेमण्याचा घाट केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी घातल्याचा आरोप केला. वंचितचे गटनेते नीलेश देव यांनी संबंधित कंपनीला काळ्यायादीमध्ये टाकण्याची मागणी केली. शिवाय त्यांनी कचरा घंटागाडीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रतीकात्मक सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांची उडवली खिल्ली
विरोधकांच्या प्रतीकात्मक सभेत सत्ताधारी गटाची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. सभागृहाचे कामकाज मनमानी पद्धतीने चालवले जाते, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच महापौर यांच्यापेक्षा इतर नेते सभागृहाचे कामकाज कसे चालवतात, याचे उदाहरण देण्यासाठी महापौरांनी निर्णय घेण्यापूर्वी त्यांना चिठ्ठी देण्यात आली. तसेच विरोध केल्या नंतर संबंधित नगरसेवकाला पडीत वॉर्ड देण्याचे आश्वासन या सभेत देण्यात आले. महापालिकेत सर्वसाधारण सभा आणि निलंबित नगरसेवकांची प्रतीकात्मक सभेने चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
