अकोला : महापालिका निवडणूक व पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर स्वीकृत सदस्य निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आठ जागांसाठी आज १९ जणांनी अर्ज दाखल केले. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ स्वीकृत सदस्य म्हणून पाठविण्याची तरतूद असताना राजकीय पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनाच संधी दिली. भाजपप्रणित शहर सुधार आघाडीने माजी नगरसेवकासह दोन वकीलांना, तर वंचित आघाडीने बिल्डरला संधी दिली. शिवसेना ठाकरे गटाने पराभूत उमेदवार व काँग्रेसने पक्षातील दोन पदाधिकाऱ्यांना स्वीकृत सदस्यासाठी शिफारस केली आहे.

महापालिका अधिनियमानुसार १० सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. त्यानुसार ८० संख्याबळ असलेल्या महापालिकेत एकूण आठ स्वीकृत नगरसेवक अकोला महापालिकेत निवडले जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३८ जागा निवडून आल्याने भाजपचे चार, तर २१ जागा निवडून आलेल्या काँग्रेसचे दोन, शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचा प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडले जातील. भाजपने माजी नगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांना पुन्हा एकदा संधी दिली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षात घरवापसी केली होती. भाजपचे पदाधिकारी ॲड. देवाशिष काकड, चंदा शर्मा, महानगर विकास समितीचे सुनील मेश्राम यांची शहर सुधार आघाडीकडून शिफारस करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने पराभूत उमेदवार शंकर लंगोटे यांना, तर वंचित बहुजन आघाडीने बिल्डर सुनील इन्नानी यांच्या नावाची शिफारस केली.

काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी प्रचंड चूरस बघायला मिळाली. प्रदेश काँग्रेसने आकाश कवडे, इलीयास खान अलीयार खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. काँग्रेसच्या इतरही अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदासाठी डॉ.पूजा खेतान, गोवर्धन वाघाडे, अखतरबी शेख हनीफ, महेंद्र गवई, मुबीन उल्लाह खान तकदीर खान, सैय्यद यासीन सैय्यद इसाक, अलमदीहा फातेमा रिय्याज खान लोधी, रिय्याज खान फत्तेह खान, आबीद खान जावेद खान, सुरज लोणारे आणि पूजा काळे यांचे अर्ज दाखल आहेत. मात्र, गटनेत्यांची शिफारस नसल्याने ते पात्र ठरणार नसल्याची माहिती आहे. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी ९ मार्चला महापालिकेची सभा होणार आहे.

अर्जांची छाननी होणार

स्वीकृत नगरसेवक पदांसाठी पात्र अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर गटनेत्यांनी शिफारस केलेली नावे ९ मार्चला सभेपुढे ठेवली जातील, अशी माहिती अकोला महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.