अकोला : अकोला महापालिकेच्या स्थायीसह विविध समित्यांचे सभापती निवडण्यासाठी आज विशेष सभा बोलविण्यात आली होती. सभापती पदांवरही भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. स्थायी समिती सभापतीपदावर शहर सुधार आघाडीतील भाजपचे विजय अग्रवाल विजयी झाले. त्यांना नऊ मते मिळाली. माजी महापौर विजय अग्रवाल यांची या अगोदर देखील स्थायी समिती सभापतीपद सांभाळले आहे. पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला.

अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती व प्रभाग समिती सभापती पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा घेण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात महापालिका आयुक्तांनी पाठवला होता. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अकोला महापालिकेच्या सभापती पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आज सकाळी ११ वाजतापासून स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होत्या. या सभापती पदांसाठी नामनिर्देश पत्र दाखल झाले होते. त्यामध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी शहर सुधार आघाडीकडून भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे मोहम्मद फजलू अब्दुल करीम यांचा अर्ज दाखल होता. अपेक्षेप्रमाणे शहर सुधार आघाडीच्या नऊ स्थायी समिती सदस्यांनी विजय अग्रवाल यांना मतदान केल्याने ते विजयी झाले. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवाराला सहा मते मिळाली. त्यांना काँग्रेस चार, वंचित आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक मत मिळाले. ‘एआयएमआयएम’ च्या सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. स्थायी समिती सभापतीपदावर विजय अग्रवाल विजय झाल्याचे जाहीर करताच त्यांच्या समर्थकांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेत फटाके फोडून एकच जल्लोष केला.

महिला व बालकल्याण सभापतीपदी शहर सुधार आघाडीच्या आरती घोगलीया, पूर्व प्रभाग समिती सभापतीपदी रश्मी अवचार, पश्चिममध्ये राजेश्वर धोटे, दक्षिणमध्ये शहर सुधार आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पूजा गावंडे आणि काँग्रेसच्या जैनब बी शेख इब्राहिम यांची उत्तर प्रभाग समिती सभापतीपदी निवड झाली आहे. यावेळी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा आदी उपस्थित होते.

शहर विकासासाठी कार्य करणार – विजय अग्रवाल

स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात शहर विकासाच्या कामाला गती देणार असल्याची भावना नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी व्यक्त केली.