अकोला : अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभेदरम्यान एका नगरसेविकेच्या पतीने सभागृहात प्रवेश घेतल्याने चांगलाचा गोंधळ उडाला. यावेळी सभागपती विजय अग्रवाल व नगरसेविकेच्या पतीमध्ये मोठी बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन सुरक्षारक्षकांना निलंबित करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती.

नेमकी घटना काय?

अकोला महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती गजानन कांबळे सभागृहात दाखल झाले. यावेळी त्यांनी सभापती विजय अग्रवाल यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर विजय अग्रवाल यांनी ही सभा सुरू आहे, यामध्ये आपल्याला प्रवेश करता येत नाही, असे सांगितले. त्यावर कांबळे यांनी जनतेचा प्रश्न असल्याचे म्हणाले. विजय अग्रवाल यांनी हे बिल्कुल बरोबर नाही, सभा संपल्यावर बोलू, असे म्हटले. तरीही कांबळे बाहेर न गेल्याने विजय अग्रवाल यांनी संतप्त होऊन त्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.

दोघांमध्ये चांगलीच जुंपली

सभेमध्ये सभापती विजय अग्रवाल व नगरसेवक पती कांबळे यांच्यात चांगलीच जुंपली. सभेमध्ये येण्यासाठी कुणाची परवानगी घेतली, असा संतप्त सवाल विजय अग्रवाल यांनी केला. दलित वस्तीच्या निधीवर बोलण्यासाठी आल्याचे सांगून मला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे कांबळे म्हणाले. त्यावरून विजय अग्रवाल आणि नगरसेविका पतीमध्ये हमरी-तुमरी झाली. स्थायी समितीच्या सभेत उपस्थित इतर सदस्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. कांबळे यांना सभागृहाबाहेर नेण्यात आले.

सुरक्षा कर्मचारी करतात काय?

स्थायी समिती सभेदरम्यान सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ महापालिकेचे दोन सुरक्षा कर्मचारी तैनात होते. सभेमध्ये कुणीही प्रवेश करीत असल्याने ते सुरक्षा कर्मचारी करतात काय? असा संतप्त प्रश्न विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला विचारला. सभागृहात बोलावून विजय अग्रवाल यांनी सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केली.

सुरक्षा रक्षकांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सभापती विजय अग्रवाल यांनी संबंधित दोघांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गोंधळामुळे महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वादावादीचे असे प्रसंग नेहमीच घडत असल्याने अकोला महापालिका चर्चेत असते.