अकोला : महापालिका निवडणुकीच्या निकालात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपच्या पुढाकारातून ४४ नगरसेवकांच्या शहर सुधार आघाडी नावाने गट स्थापन केला आहे. या गटातील नगरसेवकांनी मंगळवारी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी गटाला मान्यता दिली आहे. भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निर्णायक भूमिका राहिली असून ॲड. प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेसच्या महापालिकेतील सत्तेच्या स्वप्नांवर त्यांनी पाणी फेरले आहे.

महापालिकेची निवडणूक अटीतटीची झाली. अकोलेकरांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे सत्तास्थापनाची उत्सुकता लागली होती. सत्ता समीकरण जुळवण्यासाठी ८० पैकी ४१ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे ३८ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर विकास समिती प्रत्येकी एक धरून ८० पैकी ४० जागा युतीच्या निवडून आल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, ‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट व अपक्ष यांचे देखील एकूण ४० नगरसेवक विजयी झाले. बहुमताचा भाजपला सुरुवातीपासूनच विश्वास होता.

दुसरीकडे भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी इतर पक्षांसोबत बोलणी करून समीकरण जुळवण्याची काँग्रेसने धडपड केली. कुठलेही पद न घेता इतरांना पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने दाखवली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपला रोखण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोट बांधली. महापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्याची भूमिका सुद्धा त्यांनी घेतली होती. मात्र, भाजपने शहर सुधार आघाडी नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन स्थापन करून विरोधकांचे प्रयत्न उधळून लावले.

विशेष म्हणजे विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावणारे राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर विकास समितीच्या नगरसेवकांचा भाजपच्या नेतृत्वातील गटात समावेश आहे. गटनेता म्हणून युवा नगरसेवक पवन महल्ले यांच्यावर जबाबदारी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात आज आघाडीतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. पडताळणी झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी गटाला मान्यता दिली. आता आघाडीचा म्हणजेच भाजपचा महापौर, उपमहापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधकांचे दिवास्वप्नच ठरले

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खेळीने भाजप विरोधकांचे प्रयत्न निष्फळ झाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेत आघाडीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे विरोधी नगरसेवकांचे संख्याबळ आणखी घसरले. सत्ता स्थापन करण्याचे विरोधकांचे दिवास्वप्नच ठरले आहे.