अकोला : अकोला महापालिका निवडणुकीच्या निकालात त्रिशंकू स्थिती असून कुठल्याही पक्षाकडे स्वबळावर बहुमत नाही. भाजपच्या नेतृत्वात ४४ नगरसेवकांचा शहर सुधार समितीने नावाने गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचे स्पष्ट बहुमत असल्याने आता भाजपाच्या नेतृत्वात शहर सुधार समितीची सत्ता अकोला महापालिकेत स्थापन होईल. भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाली. भाजप वगळता सर्व नगरसेवकांना एकत्रित करून सत्ता स्थापनेचे स्वप्न बघणाऱ्या काँग्रेस, वंचितच्या दाव्याचा फुगा फुटला आहे.
महापालिकेची निवडणूक अटीतटीची झाली. अकोलेकरांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे सत्तास्थापनाची उत्सुकता लागली होती. सत्ता समीकरण जुळवण्यासाठी ८० पैकी ४१ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे ३८ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर विकास समिती प्रत्येकी एक धरून ८० पैकी ४० जागा युतीच्या निवडून आल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, ‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट व अपक्ष यांचे देखील एकूण ४० नगरसेवक विजयी झाले. बहुमताचा भाजपला सुरुवातीपासूनच विश्वास होता.
दुसरीकडे भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी इतर पक्षांसोबत बोलणी करून समीकरण जुळवण्याची काँग्रेसने धडपड केली. कुठलेही पद न घेता इतरांना पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने दाखवली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित झाली. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर विकास समितीचे नगरसेवक देखील उपस्थित होते. भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोट बांधल्याचा दावा देखील केला जात होता. महापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्याची भूमिका सुद्धा त्यांनी घेतली. भाजपने शहर सुधार समिती नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन स्थापन करून विरोधकांचे प्रयत्न उधळून लावले. विशेष म्हणजे विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावणारे राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर विकास समितीच्या नगरसेवकांचा भाजपच्या नेतृत्वातील गटात समावेश आहे. गटनेता म्हणून युवा नगरसेवक पवन महल्ले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आता महापालिकेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून शहर सुधार समितीचा महापौर महापालिकेत होणार आहे.
गटात कोणते पक्ष?
शहर सुधार समितीमध्ये भाजपचे ३८, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन, राष्ट्रवादी अजित पवार गट, महानगर विकास समिती व शिवसेना शिंदे गट प्रत्येकी एक असे एकूण ४४ नगरसेवकांचा समावेश आहे.
भाजपचाच महापौर होणार
निवडणुकीपूर्वी युती करीत भाजपने ४० जागा जिंकल्या आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असून नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. भाजपचाच महापौर होणार आहे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
