अकोला : भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. बहुमातचा आकडा गाठण्यासाठी भाजपला इतर नगरसेवकांच्या समर्थनाची गरज असल्याने पवित्रकार यांचे महत्त्व वाढले. भाजपसह विरोधकांकडूनही सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू झाली. या पार्श्वभूमीवर नगरसेवक आशिष पवित्रकार यांना दोन्ही बाजूने ‘ऑफर’ आल्याची माहिती आहे. सत्तासमीकरणात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अकोला महापालिकेची निवडणूक अटीतटीची झाली. अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती झाल्या आहेत. या निवडणुकीत अकोलेकर मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिलेले नाही. ८० पैकी भाजपने सर्वाधिक ३८ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने २१ जागांवर विजय मिळवला. शिवसेना ठाकरे गट सहा, वंचित बहुजन आघाडी पाच, राष्ट्रवादी शरद पवार गट तीन, एआयएमआयएम तीन, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महानगर विकास समिती व अपक्ष प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले. आशिष पवित्रकार एकमेव अपक्ष नगरसेवक आहे.
माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आशिष पवित्रकार हे पुतणे आहेत. या अगोदर २०१२ व २०१७ मध्ये ते भाजपच्या तिकीटावर महापालिकेत निवडून आले होते. स्थानिक नेतृत्वाशी त्यांचे मतभेद असल्याने नाराज गटात त्यांचा समावेश होता. अपेक्षेप्रमाणे भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. भाजपतील नाराज गटाने तिसरी आघाडी स्थापन करण्याची चाचपणी केली. त्यात आशिष पवित्रकार यांचाही समावेश होता.
भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने तिसरी आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच नाराज गटातील तिघांचा पक्षात पुनर्प्रवेश करून घेतला. त्यानंतर प्रभाग क्रमांक १३ ड जागेवर अपक्ष म्हणून आशिष पवित्रकार निवडणूक रिंगणात उतरले. त्यांनी भाजपचे उमेदवार अनिल मुरुमकार यांचा दोन हजार १२३ मतांनी पराभव केला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे.
भाजप बहुमताच्या काठावर आहे. त्यांना समविचारी नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज राहील. दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधकांचे संख्याबळ देखील ४० च्या जवळ पोहोचत असल्याने त्यांनी सत्ता समीकरण जुळवण्याची धडपड सुरू केली. दोन्ही बाजून एकमेव अपक्ष नगरसेवकाचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आशिष पवित्रकार काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहील.
दोन्ही बाजूकडून संपर्क – पवित्रकार
दोन्ही बाजूकडून संपर्क करण्यात आला आहे. त्यांनी काही ऑफर सुद्धा दिल्या आहेत. विचार करून लवकरच निर्णय जाहीर करू, असे अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी सांगितले.
