अकोला : अन्नपदार्थांचा दर्जा आणि स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या मूर्तिजापुरातील दोन खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा कायद्यातील विविध तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने मे. महालक्ष्मी गृह उद्योग आणि मे. गजानन बिकानेर या दोन्ही आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.
खाद्यपदार्थ थेट फरशीवर
अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने मूर्तिजापुरातील मे. महालक्ष्मी गृह उद्योगाची तपासणी केली. यावेळी शेव नमकीन आणि फराळी फरसाण नमकीन या दोन खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आस्थापनेतील भिंती व छत काळवंडलेले असणे, खाद्यपदार्थ फरशीवर ठेवणे, पाण्याच्या विश्लेषणाचा अहवाल उपलब्ध नसणे, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे, प्रशिक्षणाचा अहवाल नसणे, कीटक नियंत्रणाची नोंद नसणे, परिसर अस्वच्छ असणे तसेच खिडक्यांना जाळ्या नसणे, अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. अन्न सुरक्षा कायद्यातील परिशिष्ट चारमधील स्वच्छता व सुरक्षिततेसंदर्भातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला.
मलाई पेढा आणि मिक्स मिल्क पदार्थांचे नमुन्यांचे विश्लेषण होणार
मे. गजानन बिकानेर येथेही तपासणी करण्यात आली. यावेळी मलाई पेढा आणि मिक्स मिल्क या दोन अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या आस्थापनेतही भिंती व छत काळवंडलेले असणे, खाद्यपदार्थ फरशीवर ठेवणे, प्रशिक्षणाचा अहवाल नसणे, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा आराखडा उपलब्ध नसणे, खरेदी-विक्री बिलांचा तपशील नसणे, खाद्यपदार्थांचे विश्लेषण अहवाल उपलब्ध नसणे, अस्वच्छ परिसर आणि खिडक्यांना जाळ्या नसणे, अशा गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या आस्थापनेचाही परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला.
अन्न सुरक्षा तरतुदींची अंमलबजावणी बंधनकारक
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) अमरावती स. द. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली. अन्नपदार्थ तयार करताना व साठवताना स्वच्छतेचे नियम पाळणे, कामगारांची वैद्यकीय तपासणी, आवश्यक प्रशिक्षण आणि अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्या तरतुदींची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात असल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांनी सांगितले.
