अकोला : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) वैद्यकीय शिक्षणाची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे संच विशेष सुरक्षा व्यवस्थेत अकोल्यातील शिवणी विमानतळावर दाखल झाले. भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने या प्रश्नपत्रिका अकोल्यात आणण्यात आल्या आहेत. पोलीस, महसूल व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत अत्यंत चोख बंदोबस्तात प्रश्नपत्रिका सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्या आहेत.
देशभरात २१ जूनला नीटची परीक्षा
देशभरात ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात देखील पोहचले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तपास केला जात आहे. देशातील नीट परीक्षा आता पुन्हा घेतली जाणार असून, यासाठी २१ जून २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि प्रश्नपत्रिका पुन्हा फुटण्याचे प्रकार होऊ नये, यासाठी यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. परीक्षेची गोपनीयता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने अनेक कठोर निर्णय देखील घेतले आहेत. सुरक्षा व्यवस्था अधिक वाढविण्यात आली. त्यासाठी सैन्य दलाची मदत घेतली जात आहे.
‘नीट’ प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान विशेष खबरदारी
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीनंतर आता २१ जूनला परीक्षा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने नीटच्या प्रश्नपत्रिका अकोल्यातील शिवणी विमानतळावर दाखल झाल्या आहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिका सुरक्षित ठिकाणी असलेल्या केंद्रांवर नेण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली जात आहे.
बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था
‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली. केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, प्रवेश नियंत्रण तसेच २४ तास सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. परीक्षा केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधा, आसन व्यवस्था, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
