अकोला : नीट पेपर फूट प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या शहरातील आरसीसी क्लासमधील साहित्य व कागदपत्रे दुसऱ्या ठिकाणी हलविल्याचा आरोप वंचित आघाडीने केला. या विरुद्ध प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन युवा आघाडी आणि महिला आघाडीने थेट पोलीस तक्रार दाखल केली. मोटेगावकर विरुद्ध गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असतांना बेनामी संपत्ती आणि विद्यार्थ्यांची कागदपत्रे परस्पर गायब करणाऱ्या सर्वांना सहआरोपी करण्याची मागणी केली.
पुरावे नष्ट किंवा तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न?
देशातील बहुचर्चित व मोठे नीट पेपर फूट प्रकरणात शिवराज मोटेगावकर आरोपी असून तो सध्या अटकेत आहे. अकोल्यातील तोष्णीवाल लेआऊटमध्ये शिवराज मोटेगावकर याचे ‘आरसीसी कोचिंग क्लास’ आहे. नेट पेपर फूट प्रकरणानंतर हा शिकवणी वर्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला. मोटेगावकर विरोधात विविध गुन्हे दाखल असून, कथित बेनामी संपत्ती तसेच नीट घोटाळ्याशी संबंधित तपास केंद्रीय यंत्रणांकडून सुरू आहे. तरीही क्लासची संपत्ती, संगणक, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या नोंदी परस्पर इतर इमारतींमध्ये हलविण्यात येत आहेत. यामुळे संभाव्य पुरावे नष्ट करण्याचा किंवा तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप वंचित आघाडीने केला.
आरोपीला सहकार्य? शुल्क परत दिले जात नसल्याच्या तक्रारी
मुख्य आरोपीला सहकार्य केल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांवर करण्यात येत आहे. सिव्हिल लाईन पोलिसांनी दोन वेळा नोटिस बजावूनही संबंधितांकडून राजरोसपणे दुसऱ्या ठिकाणी साहित्य हलवले जात आहे. दरम्यान, क्लासमध्ये प्रवेशासाठी भरलेले शुल्क परत मिळत नसल्याच्या तक्रार काही पालकांच्या आहेत. वैष्णवी पारधी आणि राधिका माहुरी यांनी कार्यालयात जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालय उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शुल्क परताव्याबाबतही कोणतीही स्पष्टता मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासादरम्यान पुरावे व मालमत्ता हलवण्याच्या आरोपांची पडताळणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
नीट पेपर फूट प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या शहरातील आरसीसी क्लासमधील साहित्य व कागदपत्रे दुसऱ्या ठिकाणी हलविल्याचा आरोप वंचित आघाडीने केला. या विरुद्ध प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन… pic.twitter.com/VsILgulpKQ
— LoksattaLive (@LoksattaLive) June 2, 2026
या अगोदर देखील ‘आरसीसी’विरोधात आंदोलन
नीट पेपर फूट प्रकरणात शिवराज मोटेगावकर याचे नाव पुढे आल्यानंतर अकोल्यातील क्लासमध्ये मनसेच्यावतीने तीव्र आांदोलन छेडण्यात आले होते. क्लासच्या फलकांना काळे फासून तोडफोड करीत विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना शुल्क परत देण्यात आले नाही.
