अकोला : गोळीबार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार गावात रविवारी सायंकाळी घडला. सहा गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली. अमोल गजानन मालोकार असे मृतकाचे नाव आहे. परिवारातील शेतीच्या वादातून नातेवाईकानेच हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

नेमकी घटना काय?

अकोला शहरापासून काही कि.मी. अंतरावर असलेल्या निंबी मालोकार हे गाव गोळीबार आणि हत्येच्या घटनेने चांगलेच हादरले आहे. निंबी मालोकार शेतशिवारात रविवारी सायंकाळी अमोल मालोकार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुमारे सहा गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या आहेत. कान व शरीराच्या इतर भागात त्यांना गोळ्या लागल्या. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळावर धाव

निंबी मालोकार येथे गोळीबारीच्या घटनेतून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. न्यायवैद्यक पथकालाही घटनास्थळी पाचारण केले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितील लेव्हरकर यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळावर दाखल झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.   

परिवारातील शेतीचा वाद पोहोचला हत्याकांडापर्यंत

मालोकार परिवारामध्ये शेतीचा जुना वाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा वाद चांगलाच पेटला. परिवारातील शेतीचा वाद थेट हत्याकांडापर्यंत पोहोचला. गोळीबार करून अमोल मालोकार यांची हत्या केली. परिवारातील वादातून रक्तरंजित थराराची घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. 

नातेवाईकच मुख्य संशयित

निंबी मालोकार गावात अमोल मालोकार यांची गोळी मारून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सहा गोळ्या झाडण्यात आल्या. प्राथमिक माहितीनुसार शेत रस्त्याचा जुना वाद परिवारात आहे. त्यातूनच ही हत्या झाल्याचा अंदाज असून नातेवाईकावरच मुख्य संशय आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू केला. सध्या तपास प्राथमिक स्तरावर असून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल. लवकरच आरोपींना अटक केले जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली.