अकोला : अकोला महापालिकेत भाजप नेतृत्वातील ‘शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल गोगे विजयी झाले. त्यांना ८० पैकी ४५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांना ३२ मते पडली. भाजपचे अपक्ष बंडखोर नगरसेवक आशिष पावित्रकर यांनी देखील भाजपच्या बाजूने मत दिले, तर ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक तटस्थ राहिले. अकोला महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे.
अकोला महापालिकेची निवडणूक अटीतटीची झाली. अकोलेकरांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेची उत्सुकता लागली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे ३८ नगरसेवक आहेत. बहुमताचा भाजपला सुरुवातीपासूनच विश्वास होता. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी इतर पक्षांसोबत बोलणी करून समीकरण जुळवण्याची काँग्रेसने धडपड केली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपला रोखण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोट बांधली. मात्र, भाजपने शहर सुधार आघाडी नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन स्थापन करून विरोधकांचे प्रयत्न उधळून लावले.
महापौर व उपमहापौरांची निवड करण्यासाठी आज महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी कामकाज पाहिले. महापौर पदासाठी तीन उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्रे दाखल होती, तर उपमहापौर पदासाठी चार उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुरेखा काळे व उपमहापौर पदासाठी भाजपचे अनिल गोगे व काँग्रेसचे आझाद खान अलीयार खान यांच्यात थेट लढत झाली. इतर उमेदवारांनी माघार घेतली.
या निवडणुकीत शहर सुधार आघाडीच्यावतीने भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी, तर उपमहापौरपदी अनिल गोगे ४५ नगरसेवकांची मते घेऊन विजयी झाले. शहर सुधार आघाडीतील भाजप ३८, राष्ट्रवादी शरद पवार गट तीन, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, महानगर विकास समिती प्रत्येकी एक आणि भाजप बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांची मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांना ३२ मते पडली. त्यामध्ये काँग्रेस २१, शिवसेना ठाकरे गट सहा आणि वंचित आघाडीच्या पाच नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपला राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व अपक्षाची साथ मिळाली. अकोला महापालिकेत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

