अकोला : मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरने विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून घेत स्वत:चे आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात शनिवारी सायंकाळी घडला आहे. समुपदेशन व उपचाराद्वारे असंख्य रुग्णांना तणाव, नैराश्य व मानसिक आजारमुक्त करणाऱ्या डॉक्टरांनी स्वत:च आत्महत्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. जीवनात अनेकवेळा तणावाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी तणावाच्या परिस्थितीतून जावेच लागते. या तणावामुळे अनेक आजार होऊ शकतात. तणाव निवारणासाठी मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करून घेण्याचा सल्ला दिला जातो. समुपदेशानाद्वारे देखील तणावावर नियंत्रण मिळवता येते. अकोल्यात मात्र एक वेगळेच प्रकरण समोर आले. असंख्य रुग्णांचे जीवन तणावमुक्त करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनीच आपले जीवन संपवल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळासह शहरात खळबळ उडाली.
दरम्यान, शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. आपल्या न्यू तापडिया नगर येथील राहत्या घरी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र रुग्णालयामध्ये डॉ. प्रशांत जावरकर हे गत अनेक वर्षांपासून कार्यरत होते. निष्ठेने वैद्यकीय सेवा करतांना त्यांनी असंख्य मानसिक रुग्णांना तणावमुक्त केले. मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांचे ते समुपदेशन करीत होते. मात्र, आता डॉक्टरांनी स्वतःच टोकाचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नैराश्य व तणावावर नियंत्रण आवश्यक
विविध कारणांवरून जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होत असते. प्रत्येकाला विविध पातळीवर अडीअडचणींचा सामना करावा लागतो. यातून जीवनात नैराश्य पसरते. नैराश्य व तणाव यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा, वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंता यातून तणाव वाढत जातो. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन निरर्थक व नीरस वाटते, तेव्हा नैसर्गिकरित्या त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात.