अकोला : मंदिरातील मूर्तीवरील दागिने लांबवणाऱ्या अट्टल चोरट्याच्या अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलीस पथकाला तब्बल १२०० कि.मी.चा प्रवास करून १५० सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची पाहणी करावी लागली. त्यानंतर छत्तीसगडमधील रायपूरकडून अकोल्याकडे निघालेल्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल अटक केली.

अकोट येथील घटना

अकोट येथील देवीच्या मंदिरात मूर्तीवर असलेले ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदी ७५० ग्रॅम व दानपेटीतील रोख असा एकूण चार लाख ५४ हजारांचा मुद्देमाल २२ फेब्रुवारीला चोरी झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी एक पथक गठीत करून तपासासाठी रवाना केले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीद्वारे हा गुन्हा अमोल काशीराम तेलगोटे (वय ३९ वर्ष रा. रिधोरा ता. बाळपूर जि.अकोला) याने केल्याचे निष्पन्न झाले.

असा केला तपास

आरोपीच्या शोधासाठी एक पथक रायपूर येथे गेले. आरोपी अकोल्याकडे जाण्यासाठी निघाल्याचे पोलिसांना कळले. पोलीस पथकाने आरोपीचा पाठलाग करून अमरावतीजवळ त्याला पकडले. आरोपीला खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली दिली. आरोपीकडून एकूण सात लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात पोलीस पथकाने १५० हून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. पथकाने १२०० कि.मी.पेक्षा अधिक प्रवास करून आरोपीला अटक केली. आरोपी हा चोरी करतांना मोबाईल बंद करून दुसऱ्या व्यक्तीची विनाक्रमांच्या दुचाकीचा वापर करीत होता. यापूर्वी त्याने दोन वेळा चोरीचे प्रयत्न केल्याची कबुली दिली.

सातत्यपूर्ण प्रयत्नातून अकोला पोलिसांनी अट्टल चोरट्याला गजाआड केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, व सहकारी अधिका-यांनी
केली.

दागिने वितळवण्याचा चोरट्याचा प्रताप

चोरी केलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने ओळख लपवण्यासाठी चोरटा स्वतःच वितळवून त्याला दुसरा आकार देत होता. दागिने वितळवण्यासाठी सर्व साहित्य त्याच्याकडे उपलब्ध होते. हे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.