अकोला : सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डायल ११२’ ही सेवा नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनली. नागरिकांना पोलीस, अग्निशमन दल तसेच वैद्यकीय मदत एकाच क्रमांकावर उपलब्ध करून देण्याचे कार्य या प्रणालीद्वारे केले जाते. या वर्षात प्रणालीच्या माध्यमातून संपर्क साधलेल्या अकोल्यातील नागरिकांना अवघ्या ७.३३ मिनिटांत मदतीचा हात मिळाला. जलद संपर्क साधण्यात अकोला पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम स्थानावर असून उल्लेखनीय कामगिरी ठरली.

साडेचार महिन्यात १० हजार १६७ कॉल्स

अकोला पोलीस दलाने ‘डायल ११२’ सेवेमध्ये पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात उत्कृष्ट कार्य करीत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम स्थान पटकावले. ०१ जानेवारी ते ११ मे २०२६ या कालावधीमध्ये अकोला पोलीस ‘डायल ११२’ कक्षामार्फत एकूण १० हजार १६७ कॉल प्राप्त झाले. त्यापैकी सर्व १० हजार १६७ कॉलवर प्रभावी कार्यवाही करण्यात आली.

एकही कॉल प्रलंबित राहिलेला नाही. संपर्क अधिकारी अ यांचा सरासरी प्रतिसाद वेळ २.४९ मिनिटांचा असून डिस्पॅच अधिकारी ब यांचा सरासरी प्रतिसाद वेळ ५१ सेकंद आहे. सरासरी एमडीटी प्रतिसाद वेळ ३.४९ मिनिट समोर आला. डी.ओ. आणि एमडीटी (ब अधिक क) ४.५१ मिनिट असून एकूण प्रतिसाद ७.३३ मिनिट नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रातून ही अव्वल कामगिरी ठरली.

२४ तास सेवा कार्यरत

‘डायल ११२’ ही सेवा नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास कार्यरत असून अपघात, महिला अत्याचार, मारामारी, चोरी, संशयास्पद हालचाली, आपत्कालीन वैद्यकीय मदत किंवा इतर कोणत्याही संकटाच्या वेळी नागरिकांनी तत्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अकोला पोलीस दलामार्फत केले आहे.

प्रत्येक कॉलला तत्पर प्रतिसाद हे कर्तव्यच

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी डायल ११२ कक्षातील अधिकारी व अंमलदार यांच्या कार्याचे कौतुक करून सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. पुढेही अशा प्रकारचे उत्कृष्ट कार्य करावे, असे आवाहन करून त्यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी बक्षीस जाहीर केले. नागरिकांची सुरक्षा हीच प्राथमिकता असून प्रत्येक कॉलला तत्पर प्रतिसाद देणे हे पोलीस दलाचे कर्तव्य आहे. अकोला पोलीस दलाने मिळवलेला हा प्रथम क्रमांक नागरिकांच्या सहकार्यामुळे व पोलीस दलाच्या समर्पित कार्यामुळे शक्य झाला आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.