अकोला : पुणे येथील विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचे सत्र सुरू झाले. अवैध दारूभट्ट्यांविरोधात अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ विशेष मोहीम राबवली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारूभट्ट्यांवर कारवाई करून आरोपींची धरपकड सुरू केली. लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कारवाई कुठे?
मोहिमेंतर्गत ३१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. बार्शीटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम सिंदखेड मोरेश्वर शिवारात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती सुरू होती. पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी गावठी हातभट्टी दारू गाळताना आरोपी संजय हरिलाल केवट (वय ३५ वर्ष, रा. कापसी, ता. जि. अकोला), रमेश पंचु केवट (वय ६० वर्ष, रा. कापसी, ता. जि. अकोला), भिमराव दशरथ वानखडे (वय ५२ वर्ष, रा. सिंदखेड मोरेश्वर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) आढळून आले.
हातभट्टी दारू नष्ट
या कारवाईमध्ये टिन पत्र्याचे ८३ डबे, १२४५ लिटर मोहमाचा सडवा, ५५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २०० लिटर क्षमतेच्या चार निळ्या प्लास्टिक टाक्या, ५०० लिटर क्षमतेची टाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारुचे नमुने वेगळे काढून उर्वरित अवैध दारू व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, जीपीएसआय बोरकर, पोलीस हवालदार पठाण, पोलीस शिपाई स्वप्निल खेडकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चान्नी पोलिसांचीही हातभट्टीवर कारवाई
चान्नी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून हातभट्टीवर छापा टाकून दारू गाळणारे आरोपी विजय महादेव पांडे, जगदेव महादेव ससाणे यांच्यावर कारवाई केली. नवेगाव शेतशिवारात दारूभट्टी सुरू होती. पोलिसांनी छापा टाकून ५२५ लिटर मोहाचा सडवा, ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू असा मुद्देमाल जप्त केला. दारू गाळण्यासाठी वापरलेले इतर साहित्य देखील ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अवैध हातभट्टी दारू विरोधात सातत्याने कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती अकोला पोलिसांकडून देण्यात आली आहे.
