अकोला : रेल्वे गाडीचा अपघात झाला आणि बचाव कार्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. एक डबा दुसऱ्या डब्यावर चढला होता. या भीषण अपघातामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटाच आला. रेल्वे आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय व सज्जतेची चाचणी घेण्यासाठी पूर्णा रेल्वेस्थानक यार्ड येथे ‘मॉक ड्रील’ घेण्यात येत असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

उन्हाळी विशेष एक्स्प्रेस गाडीच्या अपघाताची परिस्थिती

दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्णा यार्ड येथे रेल्वे अपघात बचाव व पुनर्स्थापना कार्यासाठी एनडीआरएफच्या सहभागासह पूर्ण क्षमतेची ‘मॉक ड्रील’ घेण्यात आले. यामध्ये उन्हाळी विशेष एक्स्प्रेस गाडी क्रमांक ००००१ ला अपघात झाल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. त्यामध्ये एक सामान्य द्वितीय श्रेणी डबा वेगळा झाल्याचे आणि दुसरा डबा गार्ड-कम-लगेज व्हॅनवर चढल्याचे दर्शवण्यात आले. ही घटना पूर्णा स्थानक यार्डमध्ये सकाळी ९.०५ वाजता घडल्याचे गृहीत धरण्यात आले. आपत्कालीन कार्यवाहीसाठी शेजारील रेल्वे मार्ग मोकळा ठेवण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीनुसार अपघात निवारण रेल्वेगाडी, स्वयंचलित वैद्यकीय मदत वाहन, अग्निशमन दल, एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स, रेल्वे वैद्यकीय पथके आणि रेल्वे सुरक्षा बल यांना तत्काळ घटनास्थळी पाचारण केले.

डब्यांच्या खिडक्या व छताचे भाग कापून अडकलेल्या प्रवाशांची सुटका

या ‘मॉक ड्रील’दरम्यान १४ ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक आणि १५ रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांची भूमिका साकारली. सूचना मिळाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकांनी तत्काळ डब्यांच्या खिडक्या व छताचे भाग कापून अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. संयुक्त प्रयत्नांतून सर्व २९ अनुकरणात्मक जखमी प्रवाशांची यशस्वी सुटका करण्यात आली. त्या प्रवाशांवर रेल्वे व राज्य शासनाच्या वैद्यकीय पथकांनी प्रथमोपचार केले आणि सरावाचा भाग म्हणून त्यांना राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले.

१४० टन क्षमतेच्या क्रेनने पुनर्स्थापना

आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी सर्व सहभागी संस्थांनी संयुक्त निरीक्षणे नोंदवले. याचवेळी अपघात निवारण रेल्वेगाडीच्या कर्मचाऱ्यांनी १४० टन क्षमतेच्या क्रेन आणि विशेष व एआरटी उपकरणांच्या सहाय्याने पुनर्स्थापना कार्य केले. त्यामुळे रेल्वे पथकांची कमीत कमी वेळेत रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याच्या क्षमतेची पडताळणी झाली. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी तसेच प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी सरावापूर्वी आणि सरावानंतर सविस्तर मार्गदर्शन व आढावा बैठक घेतली. संपूर्ण प्रक्रियेवर वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व उपक्रमांचा समन्वय केला. या ‘मॉक ड्रील’मध्ये विविध विभागांतील सुमारे १६० रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.