अकोला : रेल्वेच्या स्वयंचलित ब्लॉक प्रणालीचे काम होणार असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. वेळापत्रक कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अप व डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक प्रणाली

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत पारस – गायगाव – अकोला विभागात अप व डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक प्रणाली (Automatic Block System) बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पायाभूत सुविधांच्या कामांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ – बडनेरा विभागात काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द, तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. २३ एप्रिल रोजी प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

‘या’ गाड्या धावणार नाहीत

२३ एप्रिल रोजी गाडी क्रमांक १११२१ भुसावळ ते वर्धा मेमू, गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा ते भुसावळ मेमू, गाडी क्रमांक ६११०१ भुसावळ बडनेरा मेमू, गाडी क्रमांक १११२२ वर्धा ते भुसावळ मेमू या गाड्यांचे रद्दीकरण केले आहे.

विलंबाने गाड्या धावणार

२३ एप्रिल रोजी गाडी क्रमांक २०८२० ओखा – पुरी एक्सप्रेसला शेगांव ते श्री क्षेत्र नागझरी दरम्यान ०२ तास २५ मिनिटे विलंब होईल. गाडी क्रमांक ११०४० गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगांव दरम्यान ०२ तास २० मिनिटे, तर गाडी क्रमांक १२४८५ हजुर साहिब नांदेड – श्री गंगा नगर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगांव दरम्यान ०२ तास विलंबाने धावणार आहे.

२३ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्रमांक २२७२३ नांदेड – श्रीगंगानगर एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावेल. २२ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्र. १७६०५ काचीगुडा – भगत की कोठी एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावेल. २२ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्र. १२७१९ जयपूर – हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावणार आहे.

प्रवाशांची गैरसोय

हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या तांत्रिक कामामुळे रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी चांगलीच वाढणार असल्याचे चित्र आहे.