अकोला : शहरातील रेल्वेच्या जागेवर तब्बल ४० वर्षांपासून असलेले अतिक्रमण सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. अकोला रेल्वेस्थानकाजवळील तार फाईल भागात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुमारे १६४ तात्पुरत्या व कायमस्वरूपी अतिक्रमण हटविण्यात आले. ही मोहीम मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभाग, विधि विभाग, रेल्वे सुरक्षा बल आणि अकोला पोलिसांच्या मदतीने यशस्वी झाली.

नेमकं घडलं काय?

अकोला रेल्वेस्थानकाजवळ तार फाइल हा परिसर आहे. या ठिकाणी रेल्वेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे अतिक्रमण थाटले होते. मध्य रेल्वेने हे अतिक्रमण हटविण्यासाठी तीन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू केली. बेदखलची नोटिस, राज्य प्रशासनासोबत संयुक्त बैठक, जमिनीची मोजमाप करून घेणे, कायदेशीर व प्रशासकीय बाबींचे निराकरण करणे तसेच स्थानिक समन्वय साधणे ही प्रक्रिया पूर्ण केली. अतिक्रमणधारकांना ३० मेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण काढण्यात आले नव्हते.

सात जेसीबी, शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती

अतिक्रमण हटविण्याची कारवाई सोमवारी करण्यात आली. तणावाची स्थिती लक्षात घेता अकोला पोलीस, शासकीय रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. समन्वयाने काही अतिक्रमणधारकांनी स्वत: जागा खाली करून दिली. काही अतिक्रमण कायम होते. अनेक जण त्याठिकाणी राहत देखील होते. यावेळी सात जेसीबी यंत्राच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात आले. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे १६० कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे ५०, शासकीय रेल्वे पोलीस ५० व ३०० अकोला पोलीस उपस्थित होते.

२५ कोटींची २२,७५० चौ.मी. जमीन अतिक्रमणमुक्त

या विशेष मोहिमेमुळे सुमारे २२ हजार ७५० चौरस मीटर मौल्यवान रेल्वे जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. एकूण १६४ अतिक्रमणे हटवून रेल्वेची जमीन पुन्हा ताब्यात घेण्यात आली. या जमिनीचे मूल्य सुमारे २५ कोटी रुपये आहे. राज्य भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीचे मोजमाप करून घेण्यात आले होते. त्यानंतरच ही कारवाई केली. या दीर्घकाळ प्रलंबित अतिक्रमणाच्या निर्मूलनामुळे परिसरातील रेल्वे विकास योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला.

काँग्रेस व वंचित आघाडीचा विरोध

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या विशेष मोहिमेचा काँग्रेस व वंचित आघाडीने तीव्र विरोध केला. मात्र, या विरोधाला झुगारून रेल्वेद्वारे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.