अकोला : भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला शक्तीचे प्रतीक मानली जाते. कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची अद्भूत क्षमता महिलांमध्ये असते. त्याचा प्रत्यय अकोला रेल्वेस्थानकावर आला. धावती रेल्वेगाडी पकडतांना वृद्ध प्रवाशाच्या पाय घसरून ते गाडीखाली जात असलेल्या जीवाचा थरकाप उडवणाऱ्या प्रसंगात मदतीसाठी ‘दुर्गा’ बनून ‘आरपीएफ’ची महिला अधिकारी धावून गेली. कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला सहाय्यक उपनिरीक्षक सोनल इंगळे यांची तत्परता आणि प्रसंगावधानामुळे एका दिव्यांग वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेची चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित होत असून महिला पोलीस अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

मोठा अनर्थ टळला

हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये आणि संस्कृतीत नारीशक्तीला देवीचे रूप मानले गेले. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. भक्तीचा जागर होत असतांनाच महिलेच्या धाडसाचे अनोखे दर्शन अकोला रेल्वेस्थानकावर घडले. अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरून गाडी क्रमांक १२६५५ नवजीवन एक्स्प्रेस सुटत असताना एका दिव्यांग वृद्ध प्रवाशाने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. याच वेळी त्यांचा पाय घसरून ते फलाट व धावती गाडी यांच्यामधील मोकळ्या जागेत पडू लागले. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदतीसाठी धाव

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महिला सहाय्यक उपनिरीक्षक सोनल इंगळे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. फलाटावरील प्रवाशांच्या मदतीने त्यांनी संबंधित वृद्ध प्रवाशाला पकडून सुरक्षितपणे बाहेर ओढले. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य गंभीर रेल्वे दुर्घटना टळली. या घटनेत प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली.

गडचिरोलीचा प्रवासी, चंद्रपूरला जाण्यासाठी निघाला, पण..

चौकशीदरम्यान संबंधित प्रवासी चंद्रपूरला जाण्यासाठी गाडीत चढत असल्याचे समोर आले. दीपक शालिग्राम सदांशिव (वय ६३ वर्षे, रा. गडचिरोली, जिल्हा गडचिरोली) अशी त्यांची ओळख पटली. त्यांच्याकडे अकोला ते चंद्रपूर या प्रवासाचे तिकीट होते. सुरक्षितपणे बचाव झाल्यानंतर त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांचे तसेच मदत करणाऱ्या प्रवाशांचे आभार मानले.

सतर्कता, कर्तव्यनिष्ठा आणि बांधिलकी

‘आरपीएफ’च्या सतर्कता, कर्तव्यनिष्ठा आणि प्रवाशांच्या सुरक्षेप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक होत आहे. रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान आणि वेळेवर केलेल्या मदतीचे महत्त्व घटनेतून अधोरेखित झाले. धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.