अकोला : रेल्वेमार्गालगत शेतांमधील पिकांचे अवशेष जाळणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. वाऱ्यामुळे ही आग पसरत जाऊन रेल्वेच्या यंत्रणेला क्षती पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे रेल्वेगाड्यांना देखील मोठा धोका निर्माण होतो. आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारचे कृत्य करतांना आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाईची सुद्धा तरतूद आहे. रेल्वेच्या यंत्रणेजवळ आग लावण्याचे प्रकार करू नये, अशा सूचना रेल्वेने दिल्या आहेत.
सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
धेंगली पिंपळगाव-मानवत रोड या रेल्वेमार्गावर आगीची एक घटना समोर आली. ही आग रेल्वेमार्गापासून काही अंतरावर असल्याने आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला कोणताही तात्काळ धोका निर्माण झाला नसला तरी, रेल्वेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांकडे ही आग पसरण्याचा संभाव्य धोका मात्र कायम होता. स्थानिक प्रशासन, ग्राम प्रतिनिधी आणि रेल्वे सुरक्षा दल जवानांच्या समन्वयाने यावर तत्काळ नियंत्रण मिळवले. या रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक मात्र विनाअडथळा सुरू राहिली. प्राथमिक निरीक्षणांवरून जवळच्या शेतजमिनींमध्ये पिकांचे अवशेष जाळल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मालमत्तेसह प्रवाशांची सुरक्षा धोक्यात
रेल्वेमार्गाजवळ पिकांचे अवशेष किंवा शेतीतील कचरा जाळल्यास आग वाऱ्यामुळे वेगाने पसरू शकते. त्यामुळे रेल्वेच्या वरून जाणारी विद्युत तार यंत्रणा, सिग्नल यंत्रणा, रेल्वेची मालमत्ता, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. रेल्वे अधिनियम, १९८९ च्या कलम १५३ नुसार, जी कोणतीही व्यक्ती जाणूनबुजून केलेल्या कृतीमुळे, निष्काळजीपणामुळे किंवा कर्तव्यातील कसूरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला किंवा रेल्वेच्या कामकाजाला धोका निर्माण करते किंवा तसा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण करते, ती व्यक्ती कठोर शिक्षेस पात्र ठरते. रेल्वेमार्गाजवळ पिकांचे अवशेष जाळणे ही एक धोकादायक कृती मानली जाते.
पाच वर्षांपर्यंतचा कारावास आणि आर्थिक दंडही
या कृत्यांसाठी जबाबदार आढळणाऱ्या आरोपीला शिक्षेस सामोरे जावे लागेल. पाच वर्षांपर्यंत कारावास, तसेच कायद्यानुसार योग्य आर्थिक दंड होऊ शकतो. रेल्वेची मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च वसूल केला जाऊ शकतो. प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेचे सुरळीत कामकाज ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. रेल्वेमार्गाच्या परिसरात सुरक्षित वातावरण राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. या प्रकारच्या घटनांवर आळा बसण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे.
