अकोला : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र, तरीही १५ टक्के पावसाची तूट कायम आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत सरासरीच्या ८५ टक्के पाऊस पडला. गत वर्षीच्या तुलनेत यंदा १८.९ टक्के कमी पाऊस पडला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
जून महिन्यात १३६.९ मि.मी. सरासरी पाऊस
यंदा मोसमी पावसाच्या आगमनाला विलंब झाला. त्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पावसाचे आगमन झाले. आठ ते दहा दिवस सलग पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. अकोला जिल्ह्यात जून महिन्यात १३६.९ मि.मी. सरासरी पाऊस पडतो. यंदा ११५.७ मि. मी. पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ८४.५ टक्के आहे. १५.५ टक्के पाऊस कमी झाला. अकोट व तेल्हारा तालुक्यात जून महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. इतर पाच तालुक्यात पावसाची तूट कायम आहे. जुलै महिन्यात ६ तारखेपर्यंत ३७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरीच्या ८५.९ टक्के पाऊस झाला. या महिन्यात पातूर, बार्शीटाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सरासरीपेक्षा अधिक त्याची नोंद झाली.
सरासरीच्या ८४.८ टक्के पाऊस
जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १८०.१ मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा जिल्ह्यात १५२.८ मि.मी. पाऊस पडला आहे. सरासरीच्या ८४.८ टक्के पाऊस झाला असून १५.२ टक्के पावसाची तूट कायम असल्याचे दिसून येते. आतापर्यंत अकोट आणि तेल्हारा तालुक्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. २०२५ मध्ये ६ जुलैपर्यंत १८६.८ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. सरासरीच्या तुलनेत १०३.७ टक्के पाऊस झाला होता. यंदा १५२.८ मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ८४.८ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत १८.९ टक्के कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट होते.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
जिल्ह्यात ६ ते ८ जुलैपर्यंत काही ठिकाणी विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. यादरम्यान ताशी ४० ते ५० कि.मी. प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह वीज आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
