अकोला : डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्युचे गूढ अकोला स्थानिक गुन्हे शाखेने उलगडले आहे. हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी काही तासांमध्ये अटक केली. आरोपीविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्य व पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?

डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ एक अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना सखोल तपासाचे निर्देश दिले.

शरीरावर आढळल्या गंभीर जखमा

रुग्णालयात मृतदेहाची पाहणी करताना शरीरावर गंभीर मारहाणीच्या जखमा आढळल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय बळावला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आले. तपासादरम्यान मृताची ओळख राजू पांडुरंग इंगळे (वय ४२, रा. फडके नगर, शिवराणा चौक, डाबकी रोड, अकोला) असल्याचे स्पष्ट झाले. मृतकाला रुग्णालयात आणणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला.

आरोपी गजाआड, मारहाणीत मृत्यू झाल्याची कबुली

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक चौकशीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुरेश रतनलाल अग्रवाल (रा. मोहरी देवी, खंडेलवाल शाळेमागे, भारती प्लॉट, जुने शहर, अकोला) याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये पूर्ववैमनस्य व पैशांच्या वादातून केलेल्या मारहाणीत राजू इंगळे यांचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अवघ्या तीन तासांत अटक केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.