अकोला : जिल्ह्यात ३०६ अपघातांच्या घटनांमध्ये १११ जणांचा बळी गेला आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी १३३ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील प्राणांतिक अपघातांमध्ये २४ टक्क्यांनी, तर अपघाती मृत्युच्या संख्येत सुमारे १७ टक्क्यांनी घट नोंदवल्या गेली. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण आणखी कमी करण्याचे आव्हान प्रादेशिक परिवहन विभागासह पोलिसांपुढे राहणार आहे.

८९ अपघात प्राणांतिक, ११० अपघातांमध्ये गंभीर दुखापत

जानेवारी ते ऑगस्ट यादरम्यान जिल्ह्यात ३०६ अपघात घडले. त्यातील ८९ अपघात प्राणांतिक, ११० अपघातांमध्ये गंभीर दुखापत, ७७ अपघातांमध्ये किरकोळ इजा व ३० अपघातांमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. गेल्या वर्षी याच काळात प्राणांतिक अपघात ११७ घडले होते. यावर्षी प्राणांतिक अपघात २८ ने कमी झाले. यावर्षी पहिल्या आठ महिन्यात १११ जणांचा अपघाती बळी गेला. अपघातांमध्ये १७४ जण गंभीर जखमी झाले असून १६३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्युची संख्या देखील कमी झाली. गेल्या वर्षी १३३ जणांचा अपघातात बळी गेला होता. यंदा २२ ने अपघाती मृत्यू संख्या कमी झाली. गंभीर जखमींची संख्या मात्र ४६ ने वाढली आहे. एकूण अपघातांचा विचार केल्यास गेल्यावर्षी २९८ अपघात झाले होते. यंदा त्यामध्ये वाढ होऊन अपघातांची संख्या ३०६ वर पोहोचली आहे.

‘या’ कारणाने प्राणघातक अपघात आणि अपघाती मृत्युंच्या संख्येत घट

रस्ते सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, वाहतूक नियमांचे पालन आणि जनजागृतीच्या विविध उपक्रमांमुळे जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत प्राणघातक रस्ते अपघात आणि अपघाती मृत्युंच्या संख्येत घट नोंदविण्यात आल्याचा दावा परिवहन विभागाने केला. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी विविध उपाययोजना व उपक्रम सातत्याने राबविण्यात आले. अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी, आवश्यक सुधारणा, वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि जनजागृती यासाठी संबंधित विभागांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

३०६ अपघातात ७८६ वाहनधारक आणि ५३० वाहने

यावर्षी पहिल्या आठ महिन्यात घडलेल्या ३०६ अपघतांमध्ये ७८६ वाहनधारक आणि त्या अपघातांमध्ये ५३० वाहनांचा सहभाग आहे. ७८६ वाहनधारकांमधील १११ जणांचा बळी गेला, तर १७४ जण गंभीर जखमी झाले. १६३ जण किरकोळ जखमी असून ३३८ जणांना कुठलीही दुखापत झाली नाही. अपघातांमध्ये दोन जनावरांचाही मृत्यू झाला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी तपासणी

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध रस्ता सुरक्षा उपक्रम राबवले. सुरक्षा अभियान व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आवश्यक त्या तपासणी व अंमलबजावणीच्या उपाययोजनाही केल्या जातात. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले.