अकोला : तत्कालीन सरसंघचालकांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून अकोल्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर कथित हल्ला प्रकरणाचा तब्बल १६ वर्षांनी निकाल लागला आहे. या बहुचर्चित प्रकरणात काँग्रेस आमदार, जिल्हाध्यक्ष, माजी महापौरांसह इतर निर्दोष असल्याचा निकाल न्यायालयाने दिला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांच्या न्यायालयाने हा निकाल सुनावला.
नेमकं प्रकरण काय?
१२ नोव्हेंबर २०१० रोजी शशांक शरदचंद्र जोशी यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करताना गांधी चौक परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर जमावाने हल्ला केल्याचा आरोप केला होता. तक्रारीनुसार, मदन भरगड, साजिद खान पठाण, मब्बा पहलवान, प्रकाश तायडे आणि अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात लाठ्या, जळते पुतळे, फटाके व दगड घेऊन संघ कार्यालयावर हल्ला केला होता. या घटनेत एक पोलीस कर्मचारी तसेच दोन संघ स्वयंसेवक जखमी झाल्याचे नमूद होते.
दंगल, बेकायदेशीर जमाव, मारहाण, मालमत्तेचे नुकसान
हल्ला प्रकरणी पोलिसांनी दंगल, बेकायदेशीर जमाव, मारहाण, मालमत्तेचे नुकसान, घरात घुसखोरी, जाळपोळ करण्याचा प्रयत्न आदी गंभीर स्वरूपाच्या आरोपांखाली भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. दिलदार खान, ॲड. दुष्यंत चव्हाण, ॲड. राजेश जाधव, ॲड. अमीन खान, ॲड. शर्मा आणि ॲड. दिपेश धायडे यांनी काम पाहिले. तत्कालीन सरसंघचालकांच्या वक्तव्यावर अकोला शहरात पडसाद उमटले होते. त्यानंतर हे हल्ला प्रकरण घडले. साक्षी-पुराव्याअभावी न्यायालयाकडून आरोपींची निर्दाेष सुटका करण्यात आली आहे. या निकालामुळे अकोल्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा या बहुचर्चित प्रकरणाची चर्चा रंगली.
