अकोला : महसूल वसुलीमध्ये परिवहन विभागाची गाडी सुसाट धावत आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातून तब्बल ३४१.५१ कोटी रुपये परिवहन विभाागाच्या तिजोरीत जमा झाले. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२५-२६ या वर्षामध्ये परिवहन विभागाच्या वसुलीत ६२.२१ कोटीने वाढ नोंदवल्या गेली. १०५.८६ टक्के महसूल जमा केला आहे. या महसुलामध्ये विविध करांसह दंडाच्या रकमेचा समावेश आहे. अकोल्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू झाल्याने वाहनधारकांसह महसूल वसुलीत देखील त्याचा लाभ झाला.

लक्ष्यापेक्षा अधिक तब्बल १०५.८६ टक्के वसुली

परिवहन विभागाकडून नव्या वाहनांची नोंदणी, वाहन चालवण्याचा परवाना यासह विविध सेवा दिल्या जातात. रस्त्यावरून वाहतूक करतांना नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई देखील परिवहन विभागाकडून केली जाते. या सर्वातून परिवहन विभागाला महसूल प्राप्त होतो. पश्चिम वऱ्हाडासाठी अकोल्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाले. त्याचा परिणाम परिवहन विभागाच्या कार्यावर दिसून आला. पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्हे मिळून २०२४-२५ मध्ये ३०९.६५ कोटींचे लक्ष्य असतांना २७९.३० कोटींची वसुली झाली होती. त्याची टक्केवारी ९०.९१ होती. २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये त्यात मोठी वाढ दिसून येते. विभागाने अकोला प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला ३२२.५९ कोटींचे लक्ष्य दिले होते. लक्ष्यापेक्षा अधिक तब्बल १०५.८६ टक्के म्हणजेच ३४१.५१ कोटी रुपयांची वसुली वाहनधारकांकडून करण्यात आली आहे.

‘महसूल’मध्ये अकोला अग्रेसर

पश्चिम वऱ्हाडात अकोला जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ११३.२८ कोटींचे लक्ष्य होते, तर १०१.१६ कोटींची ८९.३० टक्के वसुली झाली होती. २०२५-२६ मध्ये ११५.९४ कोटींच्या लक्ष्यापेक्षा अधिक ११९.८४ कोटी रुपये वसूल केले. ते १०३.३६ टक्के आहे. बुलढाणा जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये १३२.२५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील ९१.१४ टक्के म्हणजेच १२०.५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बुलढाणा जिल्ह्याला १२०.९२ कोटींचे लक्ष्य दिले होते. त्यातील ८६.७४ टक्के १०४.८९ कोटींची वसुली विभागाने केली. वाशीम जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ६४.१२ कोटींच्या उद्दिष्टापोटी ५७.६० कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्याची टक्केवारी ८९.८३ आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षांत ६५.७३ कोटी उद्दिष्टांपेक्षा अधिक ६८.८७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. नव्याने निर्माण झालेल्या खामगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला २० कोटींचे उद्दिष्ट असतांना त्यांनी ४७.९१ कोटींची वसुली केली. त्याची टक्केवारी २३९.३५ टक्के आहे.

‘महसूल’मध्ये १४.९५ टक्के वाढ

पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलढाणा व निर्माण झालेल्या खामगाव कार्यालयाच्या माध्यमातून १०५.८६ टक्के वसुली झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत वसुलीत १४.९५ टक्के वाढ झाली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले, असे अकोल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले.