अकोला : वाळू माफिया चक्क पोलिसांवरच दादागिरी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात ११ एप्रिलला मध्यरात्री घडला होता. या संदर्भात एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली. वाळू माफिया पोलिसांवर दादागिरी करीत होता, ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस देखील आपल्या वाहनातून माघारी परतले होते. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आरोपीला पोलिसांनी शेगाव येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढून त्याला धडा शिकवला.

नेमकं घडलं काय?

अकोला जिल्ह्यात वाळू माफियाची एक चित्रफित प्रसारित झाली. जिल्ह्यातील म्हैसांग भागात बोरगांव मंजू पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी ११ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास शासकीय वाहनाने गस्तीवर असतांना आरोपी शुभम दिनकर मानकर (वय ३० वर्ष, रा.भुईखेड, ता. दर्यापूर, जि.अमरावती) याने शिवीगाळ करून धमकी दिली. शासकीय वाहनावर ट्रॅक्टर व ट्रॉली आणण्याचा प्रयत्न केला. अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, शासकीय कामात अडथळा आणि ट्रॅक्टर अंगावर नेल्याच्या प्रकरणात दाखल तक्रारीवरून आरोपीविरूद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कलम १३२, २९६, ३५२, ३५१ (३) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी झाला फरार, मात्र…

गुन्ह्यातील आरोपी शुभम मानकर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी त्वरित आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी दोन पथक तयार करून फरार आरोपीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेण्यात आला. गुप्त माहितीवरून आरोपी शुभम मानकर हा शेगाव रेल्वेस्थानकाजवळ मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन बोरगांव मंजू पोलीस ठाण्यात आणले. गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपी म्हणतो, कायद्याचेच राज्य

अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्यानंतर आरोपीची भाषाच बदलली. ‘‘माझी चूक झाली. यानंतर असे कधीही करणार नाही. या ठिकाणी कायद्याचेच राज्य आहे,’’ असे आरोपी म्हणाला. पोलिसांनी आरोपीची धिंड काढून त्याला सर्वांसमोर माफी मागायला लावली. धमकावणाऱ्या आरोपीला शिताफीने अटक करून पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.