अकोला : शहरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रामध्ये बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग ७२ तास ५८० ‘सीसीटीव्ही’च्या चित्रिकरणाची तपासणी, ७०० कि.मी.चा प्रवास करून भुसावळवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चादर विक्री करण्याच्या नावावर राहून आरोपीने रेकी केली आणि संधी मिळताच सराफा दुकानावर दरोडा टाकल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे.
नेमकं घडलं काय?
शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आदर्श कॉलनीमध्ये जितेंद्र भास्कर विसपुते यांचे श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र आहे. या सराफाच्या दुकानात ७ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश केला. हातात बंदुक घेऊन त्याने विसपुते यांना धाक दाखवला. दरोडेखोराने सोने, चांदीचे विविध दाग दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात कलम ३०९ (१), (२), (३) भा.न्या. सं. कलम ३,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला.
सात अधिकारी व ५० अंमलदारांची पथके
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहर विभागातील पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी, ३० अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली चार अधिकारी आणि २० अंमलदार असे एकूण सात अधिकारी व ५० अंमलदारांची विविध पथके तपासासाठी रवाना केली. शहर व वेगवेगळ्या ठिकाणाचे एकूण ५८० ठिकाणांच्या सीसीटीव्ही चित्रिकरणाची पाहणी करून आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या शोथ घेण्यासाठी सुमारे ७०० कि.मी. चा प्रवास केला. या गुन्ह्यातील आरोपी भुसावळ येथील रोहनसिंग सतनामसिंग बावरा हा असल्याचे निष्पन्न झाले.
भुसावळ येथून शिताफीने आरोपीला अटक
स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक भुसावळ येथे दाखल होऊन सापळा रचत आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता त्याने खदान परिसरात चादर विक्रीच्या नावावर राहून सराफा दुकानाची रेकी केली आणि त्यानंतर दरोडा टाकल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरी गेलेला सुमारे १६० ग्रॅम सोने २४ लाख, ४४० ग्रॅम चांदी एक लाख २३ हजार २००, गुन्ह्यात वापरलेला विदेशी बनावटीचा देशी कट्टा ३५ हजार रुपये असा एकूण २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
