अकोला : तरुण पिढीतील वैज्ञानिक संशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ३२ व्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ यंग सायंटिस्ट्स’ परिषदेत मूळ अकोलेकर सार्थक कमलकिशोर ढोले याने भारताचे प्रतिनिधित्व करीत उल्लेखनीय कामगिरी केली. केस गळतीवरील प्रभावी संशोधनासाठी द्वितीय क्रमांकाचे रौप्य पदक पटकावले. सार्थकच्या यशाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

संशोधनाला जागतिक परीक्षकांची पसंती

न्यू दिल्ली येथे आयोजित जागतिक परिषदेत १७ देशांतील १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. अकोल्याच्या सार्थकने या स्पर्धेत ‘लाईफ सायन्सेस’ श्रेणीत संशोधन सादर केले. त्याच्या संशोधनाचा केंद्रबिंदू ‘एलोपेशिया एरियाटा’ या आजाराच्या निदान पद्धती अधिक अचूक आणि परिणामकारक करण्यावर होता. त्याने संगणकीय कौशल्य, वैज्ञानिक मांडणी आणि वैद्यकीय समस्या यांचा संगम साधत या आजाराच्या तीव्रतेचे मूल्यांकन सुधारण्याचा प्रयत्न केला. या संशोधनाला जागतिक परीक्षकांनी पसंती दर्शवत त्याला रौप्य पदक आणि द्वितीय पारितोषिकाने गौरविण्यात आले.

महाराष्ट्र आणि राजस्थानमधील ४ शहरांमध्ये कार्य

सार्थकसाठी हे संशोधन केवळ शैक्षणिक प्रकल्पापुरते मर्यादित राहिले नाही. संशोधनासोबतच तो आपल्या ‘हेडस्पेस’ संस्थेमार्फत महाराष्ट्र आणि राजस्थानमधील ४ शहरांमध्ये रुग्णांसाठी आधार गटांचे काम पाहतो. यासाठी चर्चा, चित्रकला आणि संवादात्मक उपक्रमांचे प्रत्यक्ष व ऑनलाइन स्वरूपात आयोजन केले जाते. आतापर्यंत १५० हून अधिक रुग्णांनी या उपक्रमामधून आपले अनुभव, संघर्ष आणि प्रवास कथन केले आहेत.

यापूर्वीही भारताचे प्रतिनिधित्व; कांस्य पदकाने सन्मान

यापूर्वी २१ ते २६ एप्रिल २०२४ दरम्यान तुर्कीमधील इझमिर येथे झालेल्या ३० व्या ‘आयसीवायएस’ परिषदेतही सार्थकने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी ‘इंजिनिअरिंग श्रेणीत फोटोव्होल्टेइक फिजिक्स आणि ग्रॅट्झेल सेल’ यावर आधारित संशोधन सादर केले. सौरऊर्जा निर्मिती अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने केलेल्या या संशोधनासाठी त्याला कांस्य पदक मिळाले, तसेच फलक सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचा विशेष बहुमानही प्राप्त झाला. सलग दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पदके मिळवत सार्थकने आपली संशोधक वृत्ती आणि सातत्य सिद्ध केले.

८० लाखांवर शिष्यवृत्ती, प्रेरणादायी प्रवास

संशोधनात्मक कामगिरीसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशांच्या बळावर सार्थक सध्या भारतातील सर्वोच्च शाळांपैकी एक असलेल्या जयपूर येथील जयश्री पेरीवाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत आहे. विविध नामांकित शाळा आणि संशोधन फेलोशिप्समधून त्याला एकूण ८० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या आहेत. अकोल्यातून जागतिक स्तरावरील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या सार्थकचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.