अकोला : वाहनांद्वारे प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण रोखण्याची गरज आहे. अकोल्यात सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून दुचाकीसाठी वैशिष्ट्यपूर्ण उपकरण विकसित करण्यात आले आहे. दुचाकी वाहन सिग्नलवर उभे असतांना पर्यावरण हानी रोखण्यासह ते संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा केला आहे.

काय आहे ई.जी.आर प्रणाली

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेअंतर्गत अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रभात किड्स स्कूलमधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी अर्णव गोलोकार याने दुचाकी वाहनांमधून होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एक अभिनव ई.जी.आर.( निष्कासित वायू पुनर्चक्रण प्रणाली ) उपकरण विकसित केले. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रणाली उपयुक्त; अतिरिक्त उष्णताही कमी होण्यास मदत होते, असा दावा आहे. दुचाकी वाहने सिग्नलवर थांबलेली असताना किंवा ‘आयडल मोड’मध्ये असताना मोठ्या प्रमाणावर ‘नायट्रोजन ऑक्साइड’सारखे हानिकारक वायू वातावरणात सोडले जातात. या समस्येचा अभ्यास करून अर्णवने हे वैशिष्ट्यपूर्ण उपकरण तयार केले आहे.

अर्णवने विकसित केलेले हे उपकरण दुचाकी वाहनांमधून होणारे ‘नायट्रोजन ऑक्साइड’सारखे घातक वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत करणार आहे. विशेषतः वाहने सिग्नलवर थांबलेली असताना किंवा आयडल स्थितीत असताना निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. यामुळे केवळ ‘ग्रीन हाऊस गॅसेस’चे प्रमाण कमी होणार नाही, तर वाहनांमधून निर्माण होणारी अतिरिक्त उष्णताही कमी होण्यास मदत होणार आहे.

लहान वयातच पर्यावरण संवर्धनाचा विचार

लहान वयात पर्यावरण संवर्धनाचा विचार करून तयार केलेल्या अर्णवच्या या नावीन्यपूर्ण संशोधनाला प्रभात किड्स स्कूलचे संस्थापक संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे, परीक्षा विभाग प्रमुख व्ही. अनुराधा यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतून बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या माध्यमातून बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केल्या जाते. ही स्पर्धा मुंबई येथील सायन्स टीचर असोसिएशनच्यावतीने १९८१ पासून घेण्यात येते. उच्चस्तरीय व अत्यंत प्रतिष्ठित अशी ही स्पर्धा असते. राज्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार आणि ज्ञान वाढवण्याचा स्पर्धेचा प्रयत्न असतो. या स्पर्धेमध्ये अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलमधील अर्णव गोलोकार याची निवड झाली आहे.