अकोला : रथ, मेणा, अश्व, टाळ मृदंगाचा गजर, नामघोष, सातशे वारकरी, ओसंडून वाहणारा उत्साह आणि भारावलेले पवित्र वातावरण. अशा राजवैभवी थाटात संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी राजराजेश्वरनगरीत आगमन झाले. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’,‘गण गण गणांत बोते’, अशा जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी निघालेल्या पालखीचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.

पालखीचे ५७ वे वर्ष; १९६८ पासून अपवाद वगळता अखंड परंपरा

आषाढी एकादशीसाठी ‘श्रीं’ची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानची पालखी परंपरा १९६८ पासून अपवाद वगळता अखंड सुरू आहे. यावर्षी पालखीचे ५७ वे वर्ष आहे. संतनगरी शेगाव येथून २१ जूनला निघालेल्या पालखीचे सोमवारी जिल्ह्यात आगमन झाले. २२ जूनला भौरद येथे पालखीचा मुक्काम होता. त्यानंतर आज अकोला शहरात चैतन्यमय वातावरणात ‘श्रीं’च्या पालखीचे आगमन झाले.

हजारो भाविकांनी घेतले दर्शन

टाळकरी, मृदंग वादक, कीर्तनकार आणि वारकऱ्यांसह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात विश्रांती होती. त्यानंतर पालखी गोडबोले प्लॉट येथून मार्गस्थ झाली. डाबकी मार्ग, जुने शहरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, शहर कोतवाली, गांधी मार्ग, चिवचिव बाजार मार्गे मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचे आगमन झाले.

आकर्षक रांगोळ्या, सजावट

पालखीच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली आहे. विविध ठिकाणी पालखीचे भक्तांकडून उत्साहात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना थंडपेय, फळे आदींचे ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थांकडून वाटप केले. स्वयंसेवकांनी सेवा देखील दिली. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तनासह अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत. संत गजानन महाराजांच्या भक्तीत भाविक-भक्त तल्लीन झाले आहेत.

अकोल्यात पालखीचा दोन दिवस मुक्काम

शहरात पालखीचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे. २३ जूनला बाजोरिया विद्यालयात मुक्कम केल्यानंतर २४ जूनला सकाळी ६ वाजता पालखी शहर परिक्रमेसाठी निघेल. गोरक्षण मार्ग, आदर्श कॉलनी, शाळा क्रमांक १६ येथून पुढे जिल्हा कारागृह चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हरिहर पेठकडे पालखी जाईल. २४ जूनला पालखीचा श्री शिवाजी विद्यालयात मुक्काम राहील. २५ जूनला पालखी पुढील प्रवासासाठी रवाना होईल.