अकोला : शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखासह चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाणे येथे मध्यरात्रीच्या सुमारास हा पक्षप्रवेश सोहळा झाला. शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महापालिकेत सहा नगरसेवक निवडून आले होते.
त्यातील चार नगरसेवकांनी पक्षांतर करून शिवसेना शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. महापालिका निवडणुकीनंतर अकोल्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडून आला.अकोला महापालिकेच्या निवडणुकीनंतर थंडावलेल्या राजकीय हालचालीला पुन्हा एकदा वेग आला आहे. अकोल्यात शिवसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाला जबर धक्का दिला.
अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले. नुकत्याच झालेल्या अकोला महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे सहा, तर शिवसेना शिंदे गटाचा एकच नगरसेवक निवडून आला. महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व स्वीकृत सदस्यांची निवड झाल्यानंतर आता मोठी उलथापालथ झाली.

भाजपप्रणित शहर विकास आघाडीतील घटक म्हणून शिवसेना शिंदे गट अकोला महापालिकेत सत्तेत आहे. शिवसेना ठाकरे गट विरोधी बाकावर बसले आहेत. दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फुटून शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे मंगळवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली.
त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा एकनाथ शिंदे राज्यात परतले. ते रात्री दोनच्या सुमारास ठाण्यात आले. त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे नगरसेवक त्याठिकाणी आले होते. मध्यरात्री दोन वाजता या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे, नगरसेवक मनोज पाटील, सागर भारुका, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाचे केवळ दोन नगरसेवक राहिले आहेत. नगरसेवकांनी केलेल्या पक्षांतरामुळे शिवसेना ठाकरे गटाला हादरा बसला आहे. या पक्षांतरामुळे आगामी काळात दोन्ही शिवसेनेत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
सत्ता समीकरण जुळून आल्यानंतर पक्षांतर
विशेष म्हणजे महापालिकेचे सत्ता समीकरण जुळून आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पक्षांतर केले. शिवसेना शिंदे गटात येण्यासोबतच आता ते अकोला महापालिकेत सत्तेत सहभागी झाले आहेत.
