अकोला : पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचे कार्य दशकभरापासून रखडले आहे. धावपट्टीच्या विस्तारासाठी आवश्यक भूसंपादनासाठी निधीची वारंवार केवळ घोषणा केली जाते. प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही.

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आठ विमानतळाच्या विस्तारासाठी निधी जाहीर केला. त्यामध्ये पुन्हा एकदा अकोला विमानतळाचा उल्लेख आहे. विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीने २०८.७६ कोटीला मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पात अकोला विमानतळाच्या निधीचा आकडा नसला तरी समितीने मंजूर केलेला निधी मिळणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

धावपट्टी विस्ताराचे कार्य प्रस्तावित

अकोल्यात १९४३ मध्ये उभारलेले ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळ समृद्ध अडगळ झाली. विमानतळाच्या १४०० मीटर लांबीच्या धावपट्टीचा विस्तार १८०० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे १० वर्षांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीची एकूण ६०.६८ हेक्टर जमीन विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात दिली. धावपट्टीच्या विस्तारासाठी आणखी २२.२४ हेक्टर खासगी भूसंपादनाची गरज आहे. त्या जमिनीशिवाय विमानतळाचा विकास शक्य नसल्याचे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने स्पष्ट केले.

जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावावर निर्णयच नाही

जमीन अधिग्रहणासाठी सुमारे ८४ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २०१८-१९ मध्ये सादर केला होता. त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्याची फाईल मंत्रालयात धुळखात पडून राहिली. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भूसंपादनासाठी ठोक तरतुदीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात शिवणी विमानतळासाठी निधी काही मिळाला नाही. त्यानंतरही वर्षानुवर्षे हा प्रश्न रेंगाळतच राहिला.

विस्तारासाठी निधी किती?

शिवणी विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीची किंमत आता २०८.७६ कोटींवर गेली. गेल्या दोन अर्थसंकल्पात देखील शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार विमानतळाचे विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सूतोवाच केले आहेत. दरम्यान, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विमानतळांसंदर्भात शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी २०८.७६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली. आता अर्थसंकल्पात राज्यातील इतर विमानतळांसोबतच अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी निधी जाहीर केला. त्यामध्ये आकडा मात्र नमूद नाही. प्रत्यक्षात निधी मिळणार की पुन्हा एकदा आश्वासनावरच बोळवण केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०८.७६ कोटी हवे

शिवणी विमानतळाच्या विस्तारीत धावपट्टीच्या भूसंपादनासाठी २०८.७६ कोटींचा निधी लागणार आहे. शक्ती प्रदत्त समितीने त्याला मंजुरात दिली. अर्थसंकल्पात नेमका आकडा नमूद करण्यात आला नसला तरी तेवढा निधी शासनाकडून येणे अपेक्षित आहे.