अकोला : पूर्ववादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यातील शिवणी परिसरात घडला. चौघांनी केलेल्या मारहाणीत सैय्यद फैजान सैय्यद रफीक (वय २२, रा. किसान नगर, शिवणी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शिवणी रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

नेमकं घडलं काय?

उजेफखान नझीरखान (वय २०, रा. किसाननगर, शिवणी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार क्रांतीनगर येथे चार जणांनी पूर्ववादातून दोघांना मारहाण केली, त्याचवेळी त्यांचा मामेभाऊ सैय्यद फैजान याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या फैजानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी ठिय्या देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

सात पथकांकडून आरोपींचा शोध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची पाच आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याची दोन अशी एकूण सात पथके तयार करण्यात आली.

रेल्वेस्थानकावर सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान, आरोपी शिवणी रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते फरार होण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला. पोलिसांनी दबा धरून बसलेल्या तिघांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिघांना अटक; एक आरोपी रुग्णालयात

पोलिसांनी अक्षय गजानन कंकाळ (वय २३, रा. क्रांतीनगर, शिवणी), आदित्य शरद वानखेडे (वय २०, रा. क्रांतीनगर, शिवणी) आणि संतोष गजानन काशीदे (वय ४३, रा. न्यू भीमनगर, शिवणी) यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी सत्यम सुरेश गवई (वय २५, रा. क्रांतीनगर, शिवणी) हा देखील मारहाणीत जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी पूर्ववादातून हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, शहर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, त्याचे पथक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.