अकोला : जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटातील घोळ कायम आहेत. बरखास्ती, प्रभारी निवड, स्थगितीनंतर पुनर्नियुक्तीचा प्रकार पक्षात घडला. जुन्याच दोन पदाधिकाऱ्यांना रविवारी पुनर्नियुक्त केले. दोन विधानसभेच्या जिल्हा प्रमुखपदी चंद्रशेखर पांडे, तर तीन विधानसभेच्या महिला जिल्हा प्रमुखपदी उषा विरक यांची पुनर्नियुक्ती केली. पक्षांतर्गत नेमके चालले काय? असा प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चेत आहे.

पक्षांतर्गत ताळमेळाचा अभाव

अकोला जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटात सुरुवातीपासूनच ताळमेळ नाही. गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले. अंतर्गत वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांना पद देण्याची प्रथाच शिंदे गटात पडली. पाच विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या अकोला जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने तब्बल चार जिल्हा प्रमुख नेमले होते. निवडणुकांमधील अपयश, सातत्यपूर्ण गटबाजी, पक्षांतर्गत कुरबुरी, अंतर्गत कलहामुळे एकनाथ शिंदे यांनी जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली होती.

नियुक्ती व स्थगितीचे सत्र

अकोला जिल्हा विशेष प्रभारी म्हणून ललित वानखडे यांच्यावर जबाबदारी दिली. पक्षाची नव्याने कार्यकारिणी गठित करण्याऐवजी जुन्याच कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील १६ जून रोजी करण्यात आलेल्या नेमणुकांना पुढील आदेशापर्यंत अवघ्या चार दिवसांतच स्थगिती दिली होती.

पुनर्नियुक्तीमध्ये दोन पदाधिकाऱ्यांवर नव्याने जबाबदारी

अकोला लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांनी जिल्ह्यात दौरा करून संघटनात्मक आढावा घेतला. पक्षांतर्गत नियुक्त्यांकडे लक्ष लागले होते. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने दोन नियुक्त्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर विधानसभेच्या जिल्हा प्रमुखपदी चंद्रशेखर पांडे, तर अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर विधानसभेच्या महिला जिल्हा प्रमुखपदी उषा विरक यांची पुनर्नियुक्ती केली आहे. इतर नियुक्त्यांची प्रतीक्षा कायम आहे.

पदाधिकाऱ्यांच्या अधिकाराला कात्री

पुनर्नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अधिकाराला कात्री लावण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रशेखर पांडे यांच्याकडे तीन विधानसभा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती. आता नियुक्तीमध्ये त्यातील अकोट वगळण्यात आले आहे. उषा विरक यांना महिला जिल्हा प्रमुख यापूर्वी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे तीन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाही. त्या पदांवर कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.