अकोला : मौसमी पावसाचे उशिराने आगमन झाल्यानंतर पेरणीला वेग आला. मात्र, आता शेतकऱ्यांपुढे नवीन अडचण निर्माण झाली आहे. विशिष्ट कंपन्यांच्या सोयाबीन वाणाची उगवणक्षमता कमी असल्याचा प्रकार समोर आला असून शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. विशिष्ट कंपन्यांकडून सदोष बियाण्यांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
यंदा मोसमी पावसाचे विलंबाने आगमन झाले. जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे ८० ते ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरणीनंतर सोयाबीन पिकाच्या काही विशिष्ट कंपन्यांच्या वाणांमध्ये उगवणक्षमता कमी असल्याच्या किंवा बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रमाणित बियाण्यांसंदर्भात सुद्धा तक्रारी आहेत. या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तातडीने शासकीय नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश आ. रणधीर सावरकरांनी दिले आहेत.
उत्पादनाला फटका बसणार?
यावर्षी पावसाळा लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाला देखील उशीर झाला. पेरणीला झालेल्या विलंबामुळे खरीप उत्पादनात अगोदरच घट होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना सदोष बियाणे दिल्या गेले, तर त्याचा फटका शेतकऱ्याच्या उत्पन्नाला बसणार आहे. हा सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांकडून सदोष बियाणे दिले गेले, त्या तक्रारींची प्रत्यक्ष शेतीमध्ये पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेणे आवश्यक आहे. या सर्व प्रकरणात चौकशी करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार रणधीर सावरकरांनी दिल्या आहेत.
सदोष बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा
सदोष बियाणे विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना त्वरित बियाणे उपलब्ध करून दिल्या गेले, तर त्याची पेरणी सुद्धा होऊ शकते. अन्यथा शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन कृषी विभागाने बियाणे, खते, कीटकनाহাके निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तक्रार निवारण समितीमार्फत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले आहेत. उगवणक्षमता कमी असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
