अकोला : शहरात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने आमदार टी राजा सिंह यांच्या सभेचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले आहे. दरम्यान, या सभेच्या काही तास अगोदर वादाची ठिणगी पडली. वंचितने या सभेला विरोध केला आहे. धार्मिक तेढ निर्माण करून जातीयवाद करणाऱ्या टी राजा सिंह यांच्या सभेला परवानगी दिल्याचा निषेध वंचित आघाडीने केला. जातीय तेढ निर्माण झाल्यास त्याला जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जबाबदार राहतील, असा इशारा वंचित आघाडीने दिला. या संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
टी. राजा सिंह यांच्या सभेला विरोध
शहरातील गोरक्षण मार्गावरील एकविरा मैदानावर हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन समन्वय समितीच्यावतीने केले आहे. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजासिंह उपस्थित राहणार आहेत. या सभेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केली जात आहे. शहरभर स्वागताचे फलक लावले आहेत. दरम्यान, आज सभेपूर्वी वंचित आघाडीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन टी. राजा सिंह यांच्या सभेचा विरोध केला आहे.
परवानगी दिल्याचा निषेध
वंचित आघाडीने निवेदनात म्हटले,‘‘ टी. राजा सिंह हे धार्मिक तेढ निर्माण करणारे जातीयवादी व्यक्तिमत्व आहेत. द्वेषपूर्ण भाषण तसेच वैमनस्य निर्माण करण्यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधानांमुळे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना स्थानबद्धही करण्यात आले होते. द्वेषपूर्ण व जातीयवादी राजकारणाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभे आहे. अकोल्यामध्ये सभा घेण्याची आणि भाषण देण्याची परवानगी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी नेमकी कशी दिली? कोणत्याही प्रकारचा जातीय द्वेष, संघर्ष निर्माण झाल्यास त्याला जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हेच जबाबदार असतील.’’
सहमतीविना फलक, बदनामीचा कट असल्याचा आरोप
अकोला शहरात काही ठिकाणी वंचितच्या नगरसेवकांचे फलक लागले होते. लावलेले हे फलक वंचितच्या नगरसेवकांच्या सहमती शिवाय लावले गेले आहेत, असा दावा आता वंचित आघाडीने केला. बदनामी तसेच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जावा म्हणून हा भाजप-स्वयंसेवक संघाने एक विचारपूर्वक रचलेला हा कट आहे, असा गंभीर आरोप देखील वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
