अकोला : मध्य रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे देखभाल व दुरुस्तीच्या नावावर पाच दिवस न्यू तापडिया नगर मार्गावरील रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले होते. अगोदरच उड्डाणपुलाचे काम रखडले असताना त्यातच फाटक बंद ठेवल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रेल्वेच्या कारभारामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला.

‘मध्य रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप’ या मथळ्याचे वृत्त ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये प्रसारित करून या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली. याची दखल भाजपचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनी घेऊन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता ए.डी. रायबोले, उपअभियंता राजेश राठोड, उपअभियंता मृणालिनी ढंगारे, महानगराध्यक्ष जयंत मसने, नगरसेवक प्रशांत जोशी, रणजीत खेडकर, गिरीश जोशी, ॲड. देवाशिष काकड आदी उपस्थित होते.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करा – आ. सावरकर

न्यू तापडिया नगर रेल्वे फाटक त्वरित सुरू करून २०१७ मध्ये सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवाशांसाठी व नागरिकांसाठी पूर्ण करून खुले करावे, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. गुडधी येथील रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, डाबकी रोड भुयारी मार्ग आणि अकोट फाईल रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.

रेल्वे अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून खासदारांनी व्यक्त केली नाराजी

यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेचे डीआरएम तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, कामातील अडथळे ताबडतोब दूर करून कामाला गती द्या”, असे निर्देश त्यांनी दिले. १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान रेल्वे गर्डर उभारण्याचे काम रेल्वे विभाग करेल आणि त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग कामे पूर्ण करून जानेवारी महिन्यापर्यंत पूल सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उड्डाणपुलासाठी १०८ कोटी रुपयांचा निधी

आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे विशेष मागणी करून उड्डाणपुलासाठी १०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. महाविकास आघाडीच्या काळात या पुलाचे काम थांबले होते, असा आरोपीही केला आहे.
……