अकोला : उन्हाचा पारा चांगलाच वाढत असतांना अकोला शहर पुन्हा एकदा सर्वात ‘हॉट’ ठरले आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच अकोला शहराने ४४ अं.से.चा टप्पा गाठला. कालच ४३.८ अं.से. तापमानासह अकोला जगात सर्वाधिक तापमानाचे शहर ठरले होते. आज तापमानात आणखी वाढ नोंदवल्या गेली.
उन्हाच्या तीव्र झळा
दरवर्षी उन्हाळ्यात अकोला जिल्ह्याला तप्त उन्हाचे चटके बसत असतात. उन्हाळ्यात जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ होते. जिल्ह्यात दरवर्षी तापमानाचे नवनवे विक्रम रचले जातात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण होते. वातावरणात बदल झाला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तप्त उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. उन्हाच्या तीव्र लाटेत होरपळ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोला देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. त्यानंतर आज अकोला शहरातील तापमानाने ४४ अं.से.चा टप्पा देखील गाठला. नागपूर येथील हवामान विभागाने नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अकोला पुन्हा एकदा सर्वाधिक तापमानाचे शहर ठरले आहे.
विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान ४१ अं.से.च्या पार
विदर्भातील अकोल्यासह सर्वच शहरांचे तापमान ४१ अं.से.च्या पार गेले आहे. यामध्ये अकोला ४४, अमरावती ४३.८, बुलढाणा ४१.६, चंद्रपूर ४२.२, गडचिरोली ४२.६, गोंदिया ४१.१, नागपूर ४२.२, वर्धा ४३.५, वाशीम ४२.५ आणि यवतमाळ जिल्ह्यात ४२.६ अं.से. तापमानाची नोंद १४ एप्रिलला झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने १७ एप्रिलपर्यंत अकोला तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
अशी घ्या काळजी
नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
