teacher molested students Akola : जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली. या प्रकरणी नराधम शिक्षकावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
बदलापूर येथे शाळेत दोन मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. बदलापूर प्रकरणामुळे राज्य पेटलेले असतानाच अकोला जिल्ह्यातही एक धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षकानेच सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला. जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील चित्रफित दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केला. शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने हे गैरकृत्य केले. त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श केला. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. मध्यंतरीच्या काळात या शिक्षकाने शिकवणी वर्गाच्या नावावर देखील विद्यार्थिनींचा विनयभंग केला होता. या प्रकरणाची तक्रार शाळेतील एका शिक्षिकेच्या भ्रमणध्वनीवरून ‘चाईल्ड हेल्पलाईन’वर करण्यात आली होती. त्यानंतर बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शाळा गाठून विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन विचारणा केली असता विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर उरळ पोलिसांकडे धाव घेण्यात आली. पालकांनी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी मंगळवारी रात्री शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. दरम्यान, या प्रकरणात शाळेकडून आरोपी शिक्षक प्रमोद सरदारवर बुधवारी बडतर्फीची कारवाई करण्यात आली, तर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर आणि केंद्र प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे. शिक्षक – विद्यार्थिनींच्या पवित्र नात्याला काळिमा फासण्याचे काम नराधम शिक्षकाने केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
विविध पक्ष, संघटनांकडून निषेध
विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाचा विविध पक्ष, संघटनांनी तीव्र शब्दात निषेध करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी वंचित आघाडीने केली.