अकोला : लग्न जुवळतांना शारीरिक उंची, सौंदर्य याला विशेष महत्त्व दिल्या जाते. अकोल्यात मात्र एका अनोख्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. साडेतीन फुटाचा नवरदेव, तर तीन फुटाच्या नवरीने सर्वांचे लक्षवेधून घेतले. समाज माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर ‘उंची हरली, प्रेम जिंकले’ असून दोघांची जीवनगाठ बांधल्या गेली.

आयुष्यात लग्न व सुयोग्य जोडीदार निवडणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. जीवनात लग्न ही दोन व्यक्ती, कुटुंबे आणि संस्कृतींना जोडतात. लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे नाते नसून, दोन भिन्न विचारसरणीच्या कुटुंबांना जोडून नातेसंबंध वाढवण्याचा सोहळा असतो. जोडीदार निवडतांना जात, धर्म, शारीरिक सौंदर्य, उंची, शिक्षण, सांपत्तीक स्थिती आदी प्रामुख्याने पाहिल्या जाते. सुयोग्य जोडीदार आयुष्यातील अडचणींमध्ये साथ देतो, सुसंवाद साधतो आणि परस्पर सुसंवादातून नाते घट्ट करतो.

लग्नाची गाठ स्वर्गात बांधल्या जाते, असे म्हटल्या जाते. अकोल्यातील एक लग्न चांगलेच चर्चेत आले. या लग्नात साडे तीन फुटाचा नवरदेव, तीन फुटाची नवरी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. जिल्ह्यातील प्रतीक धानुका आणि मध्य प्रदेशातील रेणुका यांचा विवाह सोहळा सिरोज येथे झाला. लग्नानंतर स्वागत सोहळा शहरात करण्यात आला. नवरदेव प्रतीक हा पुणे येथे आयसीआयसीआय बँकेत ‘रिलेशनशिप मॅनेजर’ पदावर कार्यरत आहे, तर नवरी ही सिरोज येथील शाळेवर ग्रंथपाल म्हणून सेवा देते.

दरम्यान, प्रतिक यांच्या कुटुंबियांनी लग्नासाठी रेणुकाच्या कुटुंबांकडे मागणी घातली. पसंती आल्यानंतर मध्यप्रदेशातील सिरोजमध्ये दोघांचे लग्न धूमधडाक्यात झाले. अकोल्यात प्रतिक आणि रेणुकाचा स्वागत सोहळा आनंदायी वातावरणात झाला. या अनोख्या जोडप्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी व्यासपीठावर गर्दी केली होती. उंचीसमोर प्रेम जिंकले असून या लग्न सोहळ्यामुळे दोघेही अत्यंत आनंदात आहेत.

नवरदेव म्हणतो, ‘उंची प्रमाणे बायको भेटल्याचा आनंदच’

मनाप्रमाणे नवरी मिळाल्याने नवरदेव प्रतिक सध्या प्रचंड आनंदात आहे. तो म्हणाला, ‘‘आमची समाज माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघे भेटलो. पण तेव्हा वाटले नव्हते आमचे लग्न होईल. लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जात असतात, त्याचप्रमाणे देवाने बनवलेली जोडी आणि आई-वडिलांचे आशीर्वादाने आज आमचे लग्न थाटात झाले. आज खूप आनंद होत आहे की उंची प्रमाणे बायको मिळाली. हसत खेळत पुढचे आयुष्य आम्ही एकमेकांसोबत घालवणार आहोत.’’