अकोला : अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोमवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पाऊस पडला. हातातोंडाशी आलेली पिके, फळबागांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. अवकाळीच्या तडाख्याने ६५३ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार सोमवारी अकोला जिल्ह्यात हवामानात बदल दिसून आला. अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा पारा चांगलाच चढला असून अंगाची लाहीलाही होते.

जिल्ह्यात तापमानाने ४२ अं.से.चा टप्पा देखील गाठला. सोमवारी वातावरणात मोठा बदल दिसून आला. जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा पारा वाढला होता. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले.

अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात मोठे नुकसान

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे काढणीवरील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसला आहे. फळबागांना देखील या पावसामुळे नुकसान झाले. आंबा, केळीवर परिणाम झाला. काढणीवर आलेली उभी पिके आडवी पडली. मूर्तिजापूर तालुक्यातील आठ गावांमधील १८.३ हेक्टर जमिनीवरील कांदा, चिया, गहू, लिंबू व भाजीपाल्याचे नुकसान झाले.

अकोला तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा बसला. अकोला तालुक्यातील ३६ गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ६३४ हेक्टरवरील ज्वारी, गहू, कांदा व भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यात एकूण ४४ गावातील ६५३.३ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला. या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पाच जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हवामान अस्थिर राहण्याच्या सूचना

अकोट तालुक्यासह आजूबाजूच्या भागात काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.