अकोला : गुढीपाडव्याला मराठी नववर्ष सुरू होताच अकोला जिल्ह्याला अवकाळी वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात तुरळक स्वरूपात गारपीट झाली. त्यामुळे विविध पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. अकोला जिल्ह्यातील तापमानाने तर ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा देखील गाठला.

दरम्यान, राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री अकोला जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा देखील मोठ्या प्रमाणात सुटला होता. त्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे.

अवकाळी पाऊस आणि शहर अंधारात

अकोला शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. काही वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर वृक्ष पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वादळी पावसामुळे शहरातील विविध भागातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. अनेक भागात रात्री उशिरापर्यंत वीज बंद होती. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. महावितरणच्या यंत्रणेने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे कार्य करून वीज पुरवठा सुरळीत केला आहे.

वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी; आंबा, केळीचे नुकसान

अकोट शहरासह तालुक्यात गुरुवारी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह तुरळक गारपीट झाली. तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाली आहेत, तर गारांमुळे कैऱ्या गळून पडल्या. तसेच केळीचे घड फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या गारपिटीमुळे आंबा, केळी आणि गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पनज, सावरा, मंचनपूर, देऊळगाव, रंभापूर, कालवडी आदी गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली. दर्यापूर व अंजनगाव मार्गावरील शेतात गारांचा खच साचल्याचे चित्र दिसून आले. या गारपिटीमुळे काढणीला आलेला कांदा, हरभरा व संत्रा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाचा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच शेतमालाची प्रतवारी व गुणवत्ता घसरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.