अकोला : अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. वातावरणात अचानक बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. याच आठवड्यात जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारा, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार अकोला जिल्ह्यात हवामानात बदल दिसून आला. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा पारा चांगलाच चढला असून अंगाची लाहीलाही होते. जिल्ह्यात तापमानाने ४२ अं.से.चा टप्पा देखील गाठला. मात्र, या आठवड्यात सोमवारपासून वातावरणात बदल दिसून आला. या आठवड्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींचे समीकरण जुळून आले.

दिवसभर उन्हाचा पारा अन् सायंकाळी पाऊस

शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा पारा वाढला होता. सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस कोसळला. मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा देखील विस्कळीत झाला. अनेक भागातील वीज खंडित झाली आहे.

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जिल्ह्यात वादळी पावसामुळे काढणीवरील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसला आहे. फळबागांना देखील या पावसामुळे नुकसान झाले. आंबा, केळीवर परिणाम झाला. काढणीवर आलेली उभी पिके आडवी पडली. सोमवारच्या पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील आठ गावांमधील १८.३ हेक्टर जमिनीवरील कांदा, चिया, गहू, लिंबू व भाजीपाल्याचे नुकसान झाले. अकोला तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा बसला. अकोला तालुक्यातील ३६ गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ६३४ हेक्टरवरील ज्वारी, गहू, कांदा व भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यात एकूण ४४ गावातील ६५३.३ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला. या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पाच जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.