अकोला: दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकार प्रकरणी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. वाशीम जिल्ह्यात गैरप्रकार प्रकरणी ५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत त्यातील २२ जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्य.) मंगल धुपे-गायलेवाड यांनी दिली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. मात्र, या अभियानाला विविध ठिकाणी हरताळ फासण्यात आली. वाशीम जिल्ह्यातील केंद्र क्रमांक ०९०६ श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथे इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सामुदायिक कॉपी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. भरारी पथकाच्या अचानक भेटीत तसेच तपासणीत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले. या केंद्रावर एकूण ५८४ विद्यार्थ्यांची नोंदणी असून ५८१ विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणीत अत्यंत अडचणीत बसण्याची व्यवस्था, टिनशेडमध्ये परीक्षा, अपुरी प्रकाशयोजना, पंखे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, तसेच वीज खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी केली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः समान असल्याचे आढळून आले. या संदर्भात शिक्षण आयुक्तांनी १६ फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दूरध्वनीद्वारे परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच १६ फेब्रुवारी रोजीच्या पत्राद्वारेही संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या ५१ शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांना कळविण्यात आले होते. त्यापैकी श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानप्रसारक मंडळ अंतर्गत श्री. मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जुमडा येथील १० अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ७ स्वयंअर्थसहायित तत्वावरील शिक्षकांना संस्थेकडून निलंबित करण्यात आले आहे.
‘माऊली’चे पाच शिक्षक निलंबित
मातोश्री बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मांगवाडी अंतर्गत माऊली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोहजा येथील ५ स्वयंअर्थसहायित शाळेतील शिक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे. एकूण ५१ गुन्हे नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी २२ कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थांनी निलंबित केले असून उर्वरित प्रकरणांबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचेही माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे-गायकवाड यांनी सांगितले.
