अकोला : लग्न जुळल्याने भविष्याचे स्वप्न रंगवत प्री-वेडिंग शूट केले. लग्नाची खरेदी करून जय्यत तयारी देखील झाली. नियतीला मात्र वेगळंच मान्य होते. वधूसोबत विपरीत घडलं आणि तिला काळाने हिरावून घेतले. वाशीम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील तरुणीच्या आकस्मिक मृत्युमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ठरलेल्या लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच वधूचे निधन झाल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

३ मे रोजी होणार होते लग्न, मात्र पूर्वीच…

वाशीम जिल्ह्यातील तरुणीचे लग्न डोणगावजवळील एका तरुणासोबत जुळले. ३ मे २०२६ रोजी विवाह सोहळा नियोजित होता. या निमित्ताने दोन्ही कुटुंबात आनंद, उत्साहाचे वातावरण होते, तर वर-वधूंकडून नव्या आयुष्याची स्वप्ने फुलवली जात होती. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली. दागिने, कपडे तसेच इतर आवश्यक खरेदीही मोठ्या उत्साहात करण्यात आली होती.

कृषी संकल्पनेवर आधारित प्री-वेडिंग शूट

आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणांचा ठेवा जपून ठेवण्यासाठी तरुणीने आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत प्री-वेडिंग शूट केले. कृषी संकल्पनेवर आधारित हे शूट निसर्गरम्य परिसरात केले होते. नव्या संसाराची रंगीत स्वप्ने तरुणी आनंदाने रंगवत होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते.

प्रकृतीत अचानक बिघाड; विविध ठिकाणी उपचार, पण शेवटी..

१६ एप्रिल २०२६ रोजी वधूची प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार झाले. प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती अधिक गंभीर होत गेल्याने तिला शिरपूर, वाशीम, अकोला आणि शेवटी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले. त्यानंतरही २३ एप्रिल रोजी तरुणीचे निधन झाले. उन्हाचा तडाखा किंवा अतिताण यामुळे प्रकृती खालावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली तरुणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंब अक्षरश: कोलमडून पडले. आई-वडिलांची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी झाली. मुलीच्या जाण्याने आई-वडिलांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. लेकीच्या लग्नासाठी जपून ठेवलेले स्वप्न, तयारी आणि प्रयत्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले. घरात लग्नाची तयारी सुरू असतांना अचानक शोककळा पसरली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.