अकोला : वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील निजामपूर शिवारात एका सराईत गुन्हेगाराची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.  जमिनीच्या वादातून कुख्यात गुंडावर सपासप वार करून हत्या केली. आरोपी तेवढ्यावरच न थांबता त्यांनी मृतदेह ओढत नेऊन दगड बांधला आणि खाणीमध्ये टाकला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादाचा अशा पद्धतीने धक्कादायक शेवट झाला.

वाद, धमकी आणि हत्येची थरारक घटना

रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील मुंगसाजी नगर परिसरातील गायरान जमिनीच्या मालकी हक्कावरून रमेश काळे आणि आरोपींच्या कुटुंबात गत १५ वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातून अनेकवेळा संघर्ष झाला. प्रकरण न्यायालयातही प्रलंबित होते. आरोपींनी रमेश काळे याला जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून रमेशवर जीवघेणा हल्ला चढवला. लोखंडी पाईप आणि काचेच्या बाटल्यांनी त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर वार केले. निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 

दगड व दोरीने बांधलेला मृतदेह आढळला

दरम्यान, कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेताना रक्ताचा मोठा सडा आणि मृतदेह ओढत नेल्याच्या खुणा शिवारात दिसून आल्या. आरोपींनी रक्तावर माती टाकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला होता. या रक्ताळलेल्या खुणांचा माग काढत कुटुंबीय एका खदानीच्या विहिरीजवळ पोहोचले. विहिरीत शंका आल्याने दोरी ओढून पाहिली असता, दगडाला बांधलेला रमेश काळेचा मृतदेह बाहेर आला. मृतक रमेश किसन काळे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आणि वाटमारीसारखे सुमारे २५ ते ३० अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. 

हत्या प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल

हत्या प्रकरणी मृतकाची पत्नी लता रमेश काळे यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी महादु प्रल्हाद काळे, अंकुश कैलास काळे, सचिन प्रल्हाद काळे, बालाबाई प्रल्हाद काळे, चंगुलाबाई कैलास काळे (सर्व रा. निजामपूर, ता. रिसोड) आणि रवी कमल्या चव्हाण (रा. खरबी, जि. हिंगोली) या सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिसोड पोलीस आरोपींचा शोध घेत असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.